असे करा; मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन. – गजानन ननावरे.
टीम विजयदिप न्यूज.
अमेरिकन लष्करी अळी ही मूळची अमेरिका सारख्या उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील कीड २०१८ पासून भारताची आढळत आहे. ही अळी मका पिकाबरोबरच भात, ज्वारी, ऊस, भाजीपाला व कपाशी तसेच इतर बर्याच पिकावर उपजीविका करते, या किडीच्या अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्था असून साधारण ६० दिवसात तिचा एक जीवनक्रम संपतो.
यातील अळी अवस्था पिकाचे नुकसान करते, ही अळी तपकिरी रंगाची असून तिच्या डोक्यावर उलटा वाय आकाराचे चिन्ह असते व शेपटी कडील शेवटून दुसऱ्या भागावर चार काळे ठिपके असतात, ही अळी पानाचा पृष्ठभाग खरवडून खाते व नंतर तिथे छिद्र दिसतात आणि मक्याच्या पोग्यात शिरून कोवळी पाने खाते, पाने कुरतडलेल्या सारखी दिसतात व पोग्यात विष्ठा दिसून येते. ती लाकडाच्या भुश्यासारखी असते मकेची कणसे लागल्यानंतर त्या भोवतालची कोवळी पाने खाते व त्यावरील येणारे कोवळे दाणे सुद्धा खाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.
असे करा; लष्करी अळीचे व्यवस्थापन.
- मका पिकात तूर, मूग, उडीद अशी आंतरपिके घ्यावीत ती या किडीस बळी पडत नाहीत. तसेच अशा पिकामुळे मित्रकीटकांची संख्या वाढते सेंद्रिय पदार्थ वाढतात व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून मुख्य पीक सुधारते.
- सापळा पिक म्हणून नेपियर गवत लावावे त्यावर प्रथमतः कीड दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, पिकांची फेरपालट करावी उदा. मका नंतर सूर्यफूल, भुईमूग घेणे.
- मशागत पद्धती खोलवर नांगरट करावी जेणेकरून जमिनीतील किडीचे कोष उघडे होऊन पक्षी त्यांना खातील पूर्वीच्या पिकाचे अवशेष नष्ट करावेत. त्यामुळे तिथे कोष तयार होणार नाहीत. शक्यतो एकाच वेळी सर्व गावात पेरणी करावी जेणेकरून किडीचा उपद्रव कमी होईल.
- पेरणीपूर्वी बियाण्यास सायंट्रानिलीप्रोल (१९.८%) + थायोमिथॉक्झाम (१९.८%) या किटकनाशकांची ४ ग्रॅम/किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.
- अमेरिकन लष्करी अळीसाठीचा कामगंध सापळा एकरी ५ प्रमाणे लावावेत. सापळ्यातील ल्यूर विहित कालावधीत बदलावा. सापळ्यातील पतंग गोळा करून नष्ट करावेत.
- शेतात एकरी १० पक्षीथांबे उभे करा, त्यावर पक्षी बसून पिकावरील अळ्या खातील.
- परभक्षी व परोपजीवी कीटक उदा. लेडी बर्ड बिटल, मुंगळे, पक्षी, गांधीलमाशी यांचे प्रमाण वाढेल असे नियोजन करावे.
- जैविक कीडकनाशके यामध्ये मेटारायझियम एनिसोप्ली, मेटाऱ्हायशिअम, बिव्हेरिया बॅसियाना या कीडनाशकांची ५ ग्रॅम/लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
प्रादुर्भाव जास्त प्रमाणात (१०% पेक्षा जास्त) दिसून आल्यास खालील एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.
- थायोमिथोक्झाम (१२.६%) + लॅम्डा सायहॅलोथ्रीन (९.५%) ०.५ मिली प्रति लिटर पाण्यातून करावी.
- स्पिनोटोरम (११.७%) ०.५ मिली/लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५%) ०.४ मिली/लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- इमामेक्टिन बेंझोएट ०.५ ग्रॅम/लिटर पाण्यातून फवारणी करावी.
अशाप्रकारे या लष्करी अळीचे व्यवस्थापन करावे याशिवाय महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मका पिकाची शेतीशाळा घेऊन त्याद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. तसेच कीडरोग सर्वेक्षणाच्या माध्यमातून मका, हरभरा, ज्वारी, डाळिंब या पिकावर येणाऱ्या कीड व रोगांचे सर्वेक्षण केले जाते व त्या विषयी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्यासाठी वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शनही केले जात आहे.
तरी वरील प्रमाणे सर्व शेतकरी बंधूनी एकात्मिक पीक व कीड व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. असे आवाहन माळशिरस तालुका कृषी अधिकारी, गजानन ननावरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.