उजनी मायनसमध्ये.
१८ ते २० मे दरम्यान भीमा नदीत सोडले जाणार पाणी.
टीम विजयदिप न्यूज.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी वरदायी असलेले उजनी धरण आज गुरुवार १३ मे रोजी सकाळी ९ वा. प्लस मधून मायनसमध्ये गेले. स. ६ वा. उजनी धरणात केवळ ०.०७ टक्के म्हणजेच ०.०४ टीएमसी एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तर तो स.९ वाजता पूर्ण संपून ०.०० टीएमसी एवढा झाला. त्यामुळे उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यातील सर्व पाणी संपले असून धरण मायनस मध्ये गेले. योगायोग म्हणजेच मागील वर्षी देखील उजनी धरण १३ मे २०२० रोजीच मायनस मध्ये गेले होते.
मागील वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते तसेच लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे उन्हाळी हंगामात उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांना मुबलक पाणी मिळाले. त्यामुळे उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांना यावर्षी सिंचांनाबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली नाही.
आज उजनीतील ५३.५७ टीएमसी चल म्हणजेच उपयुक्त पाणीसाठा संपला. उजनी धरणात सध्या ६३.६६ टीएमसी अचल म्हणजेच मृत पाणीसाठा शिल्लक राहिला असून आता धरणातील ६३.६६ टीएमसी अचल पाणी साठयातील पाणी वापर सुरू झाला आहे. सध्या कालवा, भीमा-सिना जोड कालवा तसेच उपसा सिंचन योजनेमधून पाणी सोडले जात असून उजनी धरनामधून १८ ते २० मे दरम्यान भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे. यामुळे यावर्षी उजनी धरण मायनस २५ टक्के पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
उजनी धरणाच्या कालव्यामधून व भीमा-सिना जोड कालव्यामधुन सिंचनासाठी आवर्तन सुरू असून कालव्याचे आवर्तन साधारण पणे १८ ते २० मे पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूर यांच्या वतीने देण्यात आली.
तसेच उजणीमधून भीमा नदीला सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी १८ ते २० मे च्या दरम्यान पाणी सोडणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी दिली. उजनी मधून भीमा नदीस पाणी सोडल्यानंतर धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावणार आहे.
उजनी धरण अपडेट दि.१३ मे २०२१ स.६ वा.
पाणी पातळी | ४९१.०३५ मी |
एकूण साठा | १८०३.८१ द.ल.घ.मी (६३.६९ टीएमसी) |
उपयुक्त साठा | १.०० द.ल.घ.मी (०.०४ टीएमसी) |
टक्केवारी | ०.०७% |
सिना-माढा उपसासिंचन योजना | २९६ क्युसेक्स |
दहिगांव उपसासिंचन योजना | ८५ क्युसेक्स |
भीमा-सिना जोड कालवा | ६२० क्युसेक्स |
मुख्य कालवा | ३ हजार १५० क्युसेक्स |