टीम विजयदिप न्यूज.
तिरुपती, तिरुमाला (बालाजी) ट्रस्ट, यांचे बरोबर पुजेच्या वस्तुसाठी व्यवहार ठरला असे जाणीवपुर्वक खोटे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणारा आरोपी आंबादास उर्फ आण्णा सायबु ओरसे. (रा.राऊतनगर, अकलुज, ता. माळशिरस, जि.सोलापूर) याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, माळशिरस यांचे न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तो जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार सविस्तर वृत्त असे की, अकलूज पोलीस ठाण्यात प्रकाशराज शेषमलजी जैन, (वय ६४), धंदा-औद्योगिक, रा.१२ बी, शांती निकेतन सोसायटी, गुजरात कॉलेज जवळ, लॉ गार्डन, अहमदाबाद- ३८०००६ राज्य- गुजरात. यांनी दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेले फिर्यादीवरुन आरोपी आंबादास उर्फ आण्णा सायबु ओरसे (रा.राऊतनगर, अकलुज ता.माळशिरस, जि.सोलापूर) याने फिर्यादी तसेच फिर्यादीचे मित्र मदन मिरजकर यांची एकुण २ कोटी ७३ लाख रुपये घेवून विश्वाससघात करुन फसवणुक केल्याने त्याचेविरुध्द अकलुज पोलीस ठाणे गु. र. नं. ७८०/२०२१ भा.द.वि.सं.क. ४२०, ४०६, ४६८, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक, तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीणचे हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी केला असून त्यामध्ये आरोपीस तात्काळ अटक करुन गुन्हयाचे तपासकामी ११ दिवस पोलीस कस्टडी मिळाली. आरोपीची न्यायालयीन कोठडी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी रिमांड मिळणेनंतर आरोपीने जामीन मिळणेकरीता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, माळशिरस यांचे कोर्टात अर्ज दाखल केला होता. सुनावणीत आरोपीचे वकीलाने आरोपीची बाजु मांडलेनंतर तसेच सरकार पक्षाचे वतीने सहा.सरकारी अभियोक्ता महेश कोळेकर यांनी भक्कमपणे युक्तीवाद केल्याने आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.