आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पाच पैकी चार राज्यात भाजपाचा पराभव होईल; शरद पवार यांचे भाकीत.
पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल; शरद पवार यांचा दावा.
टीम विजयदिप न्यूज.
पाच राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ५ पैकी ४ राज्यात भाजपाचा पराभव होईल तर केवळ आसाममध्ये भाजपची सत्ता राहील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माळेगांव (बारामती) येथील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सध्या पाच राज्यामध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणूकावरती भाष्य केले त्यावेळी ते म्हणाले की, आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल, असा दावा शरद पवार यांनी केला.
पाच राज्यातील निवडणूकांवर आज सांगणे कठीण आहे. परंतु लोक निर्णय घेत असतात. पण त्या राज्यांची स्थिती मला माहित आहे त्यामध्ये माझ्यादृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही, असे शरद पवार म्हणाले.
तामिळनाडूमध्ये आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्या बाजूने आहे. ते राज्याचं सूत्र हातात घेतील लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हंटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.