…आणि मंत्री झाले फोटोग्राफर.
टीम विजयदिप न्यूज.
माणसे मोठी उगाच होत नाहीत. पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा सामान्य माणसात सामान्य होऊन राहण्यात देखील मोठेपणा असतो. त्यातच मंत्री म्हटलं की, कार्यकर्त्यांची गर्दी, गाड्यांचा ताफा, पोलीसांचा फौज-फाटा अशा प्रकारचे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पण आपल्याकडे असेही काही नेतेमंडळी आहेत, जे कितीही मोठ्या पदावर असले तरी, आपल्या वागण्या-बोलण्यातून ते सर्वांच्या मनात घर करतात. असाच एक अनुभव सोमवारी सायंकाळी मरीन ड्राईव्हला फेरफटका मारावयास गेलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (मामा) यांच्या बाबतीत घडला.
भरणे मामा हा शब्द ऐकताच समोर उभा राहते ते इंदापूर तालुक्याचे शांत-सयंमी नेतृत्व असलेले आपल्या वागण्यात व बोलण्यात साधेपण असलेले व सर्वांशी आपुलकीने संवाद साधणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे.
सोमवारी अशाच मनमिळावू भरणे मामांचे दर्शन झाले तेही फोटोग्राफरच्या रूपात. सोमवारी विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि आ.आशुतोष काळे मरीन ड्राईव्हला फेरफटका मारावयास गेले होते. त्यावेळस तेथे फिरावयास आलेल्या कांही तरुणांनी मंत्री भरणे मामांना ओळखलेच नाही व त्यांना न ओळखता ‘काका आमचा एक फोटो काढा की’…म्हणून विचारणा केली. व त्या तरुणांनी भरणे मामांच्या हातात मोबाईल पण दिला.
मामांनी कसलाही विचार न करता लगेच त्या मुलांचा मोबाईल हातात घेऊन त्यांच्या ग्रुपचा फोटो काढला. तरुणांच्या विनंतीनंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चक्क फोटोग्राफर झाले. त्यावेळेस त्या तरुणांनी फोटोसेशन केले. त्यावेळी भरणे मामा मुलांचा फोटो काढत असताना त्यांचा फोटो काढण्याचा मोह आ.आशुतोष काळे यांना आवरला नाही व महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या भरणे मामांचा साधेपणा त्यांनी कॅमेऱ्यात कैद केला.