कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करा; उपविभागीय अधिकारी शमा पवार.
टीम विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन माळशिरस उपविभाग अकलूजच्या उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी केले आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालणेकामी उपविभागीय अधिकारी शमा पवार यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि.१६ मार्च रोजी तहसिल कार्यालय माळशिरस येथे बैठक घेणेत आली. सदर बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी माळशिरस, सहा.गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी हजर होते.
गर्दीच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन व्हावे यासाठी पोलीस, महसूल व ग्रामविकास विभागाची संयुक्त पथके पोलीस स्टेशन निहाय स्थापन करणेत आली आहेत. मंगल कार्यालये, दुकाने, पानटपरी, चहाची दुकाने, मंडई, बाजार, हॉटेल, परमिट रूम इ.ठिकाणांची तपासणी करणेत येणार आहे व महाराष्ट्र शासनाचे दि.१५ मार्च २०२१ चे आदेशानुसार शासनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना कोविड-१९ या आजाराचा आपत्ती म्हणून निर्देशन जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत सिल करण्यात येणार आहेत.
तरी माळशिरस तालुक्यातील मंगल कार्यालये, दुकाने, पानटपरी, चहाची दुकाने, मंडई, बाजार, हॉटेल, परमिट रूम इ. ठिकाणी गर्दी होवू देवू नये व सर्व नागरिकांनी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीत करणेत आले आहे.