फलटण-पुणे रेल्वेचा शुभारंभ पुढील महिन्यात रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणार.
भाजपा शिष्टमंडळाने दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेवून दिले निमंत्रण.
टीम विजयदिप न्यूज.
फलटण-पुणे रेल्वेचा शुभारंभ पुढील महिन्यात रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.
दिल्लीमध्ये खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माढा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी खा.जय सिद्धेश्वर स्वामी, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.प्रशांत परिचारक, आ.जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी भेट घेऊन बहुचर्चित फलटण-पुणे रेल्वेच्या शुभारंभासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावे यासाठी निमंत्रण देण्यात आले व त्यांनी मार्च महिन्यात शुभारंभासाठी येतो असे आश्वासन दिले आहे.
गेली अनेक वर्ष झाली फलटण-बारामती-पंढरपूर या रेल्वेच्या प्रश्नावर प्रयत्न सुरू होते. परंतु माढा मतदारसंघाचे खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर झाल्यानंतर या कामाला खऱ्या अर्थाने गती आली सातत्याने रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन रेल्वे सुरू करण्याबाबत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामध्ये त्यांना यश आले गेल्या १ वर्षापूर्वी फलटण-लोणंद रेल्वे ट्रायल सुरू झाली त्यामध्ये काही अडचणी आहेत का? याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी गेल्या महिन्यामध्ये फलटण येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फलटण-पुणे रेल्वे रोज सुरू व्हावी यासाठी भूमिका घेतली ही रेल्वे सुरू झाल्यास रेल्वेच्या उत्पादनामध्ये भर पडणार आहे.
तसेच फलटण, माण, खटाव, माळशिरस या भागातून पुण्याकडे जाणारा शेतीमाल रेल्वेच्या माध्यमातून जाऊ शकतो व शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. या भागातील अनेक मुलं-मुली पुणे येथे शिक्षणासाठी राहत आहेत. त्यांनाही याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. फलटण हे भविष्यामध्ये औद्योगिक कॉरिडॉर सेंटर होणार असल्यामुळे पुण्यावरून फलटण कडे येणाऱ्या नोकरदारांची संख्या खूप आहे. त्यांनाही या रेल्वेचा फायदा होऊ शकतो तसेच फलटण व परिसरातील तालुक्यातील सर्व व्यापारी यांनाही याचा फायदा होऊ शकतो.
त्यामुळे ही रेल्वे सुरू करणे खूप गरजेचे आहे ही बाब अधिकाऱ्यांच्या व मंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला व पुढील महिन्यांमध्ये रेल्वेमंत्र्यांच्या शुभहस्ते फलटण-पुणे रेल्वे सुरू होणार अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.