माढा विधानसभा मतदार संघ; उपसा सिंचन व जलसंपदा विभागाच्या प्रलंबित कामा संदर्भात आढावा बैठक संपन्न- आ. बबनदादा शिंदे यांची माहिती.
विजयदिप न्यूज
मुकुंद रामदासी/बेंबळे।प्रतिनिधी।
माढा विधानसभा मतदारसंघातील विविध उपसा सिंचन योजनांचा आढावा व जलसंपदा विभागाच्या प्रलंबित कामाच्या अनुषंगाने कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी अधिकाऱ्यांशी माढा मतदारसंघातील विविध जलसंपदा विषयाच्या प्रलंबित कामांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली अशी माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
अधिक माहिती देताना आ.बबनदादा शिंदे म्हणाले की, माढा विधानसभा मतदारसंघ हा माढा, पंढरपूर व माळशिरस या तीन तालुक्यात विभागलेला असून कायम दुष्काळी भाग आहे. मतदारसंघातील उपसा सिंचन योजना मंजूर असून योजनांची कामे अपूर्ण राहिलेली आहेत. सदर योजनांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तसेच जलसंपदा विभागाच्या विविध कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.
या बैठकीमध्ये सीना माढा उपसा सिंचन योजना प्रलंबित कामाचा आढावा तसेच सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या पंप हाऊस (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) विभागाचा आढावा, खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेबाबत पुढील कार्यवाही, बार्शी उपसा सिंचन योजनेची माढा तालुक्यातील कामे सुरू करणे, आलेगाव खुर्द तालुका माढा व सुस्ते तालुका पंढरपूर येथील बुडीत बंधारा बांधणे बाबत, भीमा व सीना नदीवरील अस्तित्वातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेस मध्ये रूपांतर करणे बाबत, आष्टी उपसा सिंचन योजना काम अपूर्ण असले बाबत, उजनी मुख्य कालवा पुलाची चांदज तालुका माढा व बादलकोट, उंबरे पागे, २५ मायनर तालुका पंढरपूर येथील कामे होणे, मौजे रांजणी भिमानगर तालुका माढा येथील ग्रामपंचायत हद्दीतील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेत राहणाऱ्या रहिवाशांना कायमस्वरूपी जागा देणे, परिते साठवण तलावाच्या टेल कडील बाजूस, टेंभुर्णी-पंढरपूर जुना रस्ता येथे पूल बांधणे, मौजे बाभूळगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील ज्योतिर्लिंग पाणी वाटप सहकारी संस्था मर्यादित, या संस्थेस पाणी परवाना देणे, सीना-माढा योजना कालवा अस्तरीकरण सुरू आहे परंतु त्या अगोदर पिंपळनेर मेसाई ओढा, उजनी माढा किलोमीटर १७/४०० या ठिकाणच्या खराब ना दुरुस्त गेटची दुरुस्ती करणे अशा प्रकारच्या विविध सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
या बैठकीस महामंडळ कार्यकारी संचालक अतुल कपोले, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता एस टी जाधवर, कार्यकारी अभियंता माने, डी जे कोंडेकर, ना.वा जोशी, अधीक्षक अभियंता धो.बा.साठे, ज्ञानेश्वर बागडे, उपअभियंता सि.टी राठोड, उपविभागीय अधिकारी दा.ना.खडतरे, उपविभागीय अभियंता एन.आर. आल्हाट तसेच अमोल गायकवाड व उप अभियंता गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.