विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना २६१० रु. प्रति मे.टन दर देणार- आ.बबनदादा शिंदे
देशात प्रथम क्रमांकाचे ऊस गाळप करून विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता.
कामगारांना दोन महिन्याचे वेतन बोनस म्हणून देणार.
मुकुंद रामदासी
ऊस गाळपामधे देशात प्रथम क्रमांक पटकावून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर युनिट १ च्या गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. गळीत झालेल्या ऊसाला चालू हंगामातील रिकव्हरी प्रमाणे शेतकऱ्यांना २ हजार ६१० रुपये प्रति मे.टन दर, तसेच कामगारांना दोन महिन्याचे वेतन बोनस, जळीत उसाचे कपात पैसे परत करणार, पुढील हंगामात ऊसापासून डायरेक्ट इथेनॉल तयार करणार व १५० केएलपीडी चा डिस्टिलरी प्रकल्प २५० केएलपीडी विस्तारित करून चार महिन्यात चालू करणार अशी माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनदादा शिंदे यांनी दिली ते कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी बोलत होते.
प्रारंभी आ.बबनदादा शिंदे यांच्या हस्ते वजन काटा व गव्हाण यांचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष वामन भाऊ उबाळे व संचालक सचिन देशमुख यांचे हस्ते पिंपळनेर युनिट १ व करकंब युनिट २ मधून उत्पादित झालेल्या ३० लाख साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले, स्व.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजनही यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना आ.बबनदादा शिंदे म्हणाले २०२१-२२ चा गळीत हंगाम कारखान्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. या हंगामात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर युनिट १ मधून २१० दिवसात २४ लाख ७८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे, व हे विक्रमी गाळप देशात प्रथम क्रमांकाचे ठरले तसेच २३ लाख ३९ हजार क्विंटल साखर उत्पादन केली असुन साखर उतारा ११.५२ टक्के असा आहे. युनिट २ करकंब मधून ६ लाख ५५ हजार मे.टन उसाचे गाळप करून ६ लाख ६० हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. युनिट १ व युनिट २ मधून ३१ लाख मे.टन उसाचे गाळप व ३० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. आ.बबनदादा शिंदे पुढे म्हणाले की दोन्ही युनिटमधून १३ कोटी ५० हजार युनिट वीज महाराष्ट्र विद्युत मंडळाला निर्यात केली असून १५० केएलपीडीच्या डिस्टिलरी प्रकल्पातून ३ कोटी ५ लाख लिटर इथेनॉल व ३ कोटी ३५ लाख लिटर अल्कोहोल निर्माण करण्यात आले आहे, ऑइल कंपन्यांच्या करारानुसार त्यांना इथेनॉल पुरवठा चालू आहे. केंद्र सरकारने ज्या त्या हंगामातील रिकव्हरी प्रमाणे शेतकऱ्यांना दर देण्याविषयी केलेल्या नवीन नियमानुसार या हंगामाची रिकव्हरी ११.५२% असून त्याप्रमाणे शेतकऱ्यांना प्रतिटन २ हजार ६१० रुपये उसाचे एकुण बिल दिले जाणार आहे, यापैकी २ हजार १०० रुपये प्रमाणे पहिले बिल दिले असून उर्वरित ६१० रुपये पोळा व दिवाळीपर्यंत निश्चित देण्यात येतील. या हंगामात प्रत्येक दहा दिवसाला शेतकऱ्यांची ऊस बिले त्यांच्या खात्यात जमा करणारा विठ्ठलराव शिंदे हा राज्यातील पहिला साखर कारखाना असून तोडणी कामगारांची बिले व वाहतूकदारांची कमिशन डिपॉझिट रक्कम आठ दिवसात देण्यात येत आहे. तसेच कामगारांना दोन महिन्याचे वेतन बोनस म्हणून देण्यात येणार असून ऊस तोडणी कामगारां ना.धनंजय मुंडे यांनी ऊस तोडणी कामगारांच्या विम्यासाठी केलेल्या करारानुसार तीन कोटी रुपये भरणार असून, कामगारांच्या मुलांसाठीही सहकार्य करणार असल्याचे यावेळी आ.बबनदादांनी आवर्जून सांगितले .
“हिंदकेसरी बबनदादा “……
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन वामन भाऊ उबाळे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे कारखान्याने मागील २२ वर्षात राज्यात अनेक विक्रम स्थापन केले आहेत, त्यामुळे आ.बबनदादा यापूर्वीच साखर कारखानदारीतील ‘महाराष्ट्र केसरी’ म्हणून गणले जात आहेत. परंतु या हंगामात २४ लाख ७८ हजार मे.टन ऊस गाळप करून देशात प्रथम क्रमांक पटकावल्या मुळे आ.बबनदादा आता साखर कारखानदारीतील ‘हिंदकेसरी’ म्हणून सर्वत्र परिचित होतील हे निश्चित.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एन डिग्रजे यांनी केले, याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख, ठेकेदार, व मुकादम यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास संचालक सचिन देशमुख, सुभाष नागटिळक, नीलकंठ देशमुख, पांडुरंग घाडगे, लाला मोरे यांचेसह जनरल मॅनेजर सुहास यादव, केन मँनेजर संभाजी थिटे, मुख्य शेतकी अधिकारी सुनील बंडगर, विभाग प्रमुख बी. डी लवटे, अनिल वीर, सी.एस भोगाडे, सुरक्षा अधिकारी दुंगे, लवटे, देसाई, पांडुरंग बागल, सुनील शिंदे, पोपटराव येल्पले, ए.के जगताप, जगदीश देवडकर, महामुनी साळुंके, इंगवले, थोरात, संजय कैचे, आतार, रमेश खेडेकर, शशिकांत पवार आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र जाधव यांनी केले तर आभार वामन भाऊ उबाळे यांनी मानले.
‘दृष्टीक्षेपात यंदाच्या हंगामाची वैशिष्टे
एकूण गाळप युनिट- १ व २ | ३१ लाख मे.टन. |
साखर उत्पादन युनिट- १ व २ | ३० लाख क्विंटल |
साखर उतारा | ११.५२ |