पैसे मिळवून देण्याचे अमिष; २.७८ कोटींची फसवणूक, अकलूज पोलिसात गुन्हा दाखल.
टीम: विजयदिप न्यूज.
तिरुपती, तिरुमला (बालाजी) ट्रस्ट, कडून पैसे मिळवून देतो, असे खोटे अमिष दाखवून गुजरात मधील एका व्यक्तीला तब्बल २.७८ कोटी रुपयांना फसवल्याची फिर्याद अकलूज पोलिसांत दाखल असून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अकलूज पोलीसांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी प्रकाशराज शेषमलजी जैन, (वय ६४), धंदा-औद्योगिक, रा.१२ बी, शांती निकेतन सोसायटी, गुजरात कॉलेज जवळ, लॉ गार्डन, अहमदाबाद गुजरात) यास दि. २९ जून २०१९ ते आजपर्यंत आरोपी आंबादास उर्फ आण्णा सायबु ओरसे. (रा.राऊतनगर, अकलुज, ता. माळशिरस, जि.सोलापूर) याने फिर्यादीला तिरुपती, तिरुमाला (बालाजी) ट्रस्ट, देवस्थान ट्रस्ट, तिरुपती यांचे बरोबर पुजेच्या वस्तुसाठी व्यवहार ठरला आहे, त्या व्यवहाराची रक्कम ३ हजार कोटी इतकी असून ही रक्कम ट्रस्टकडून येणार आहे. असे जाणीवपुर्वक खोटे सांगितले,
तसेच फिर्यादीस १३० कोटी रुपये तुम्हाला मिळवून देतो. त्याकरीता अगोदर पैसे दयावे लागतील, असे अमिष दाखवले. आणि फिर्यादीकडून वेळोवेळी रोख व आर.टी.जी.एस.ने असे एकुण २ कोटी ५८ लाख रुपये तर फिर्यादीचे मित्र मदन मिरजकर याचेकडून १५ लाख रोख रुपये असे एकुण २ कोटी ७८ लाख रुपये घेवून फसवणुक केली आहे. तसेच फिर्यादीने आरोपीस पैसे मागितले असता, तुझ्या बायकोला उचलून आणुन बलात्कार करेन, अशी धमकी दिली आहे. तसेच पैसे मागितले म्हणून फिर्यादीच्या कानाखाली हाताने मारले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार आरोपी आंबादास उर्फ आण्णा सायबु ओरसे. (रा.राऊतनगर, अकलुज, ता. माळशिरस, जि.सोलापूर) याच्याविरोधात गु.र.नं.७८०/२०२१ भा.द.वि.सं.क. ४२०, ४०६, ४६८, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.