बिबट्याने घेतला आठ वर्षाच्या चिमुकलीचा जीव, सहा दिवसात तिसरा बळी.

करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील घटना.
टीम विजयदिप न्यूज.
करमाळा तालुक्यात मागील सहा दिवासांपासून धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक बिबट्याने आज तिसरा बळी घेतला आज चिखलठाण येथे आठ वर्षाच्या मुलीवरती हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यातच तिचा मृत्यू झाला.

नरभक्षक बिबट्या अधिकच धोकादायक ठरू लागल्याने करमाळ्याचे आ.संजयमामा शिंदे यांनी या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी वन विभागाकडे केली होती.
आ.संजयमामा शिंदे यांनी सदर बिबट्यास ठार मारण्यात यावे अशी मागणी वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार वन्यजीव अधिनियम संरक्षक कायदा १९७२ च्या कलम ११ मधील (१)(अ) कलमानुसार मुख्य वन्यजीव रक्षकांना लिखित स्वरुपात आदेश देता येतात. चौकशीनंतर त्यांनी त्या बिबट्याला पिंजरा लावून ते शक्य नसल्यास बेशुध्द करुन पकडणे तेही शक्य नसल्यास गोळ्या घालून ठार करण्याची परवानगी दिली आहे.
आज दि.०७ डिसेंबर रोजी चिखलठाण (ता. करमाळा) येथील ऊसतोडणी मजुराच्या आठ वर्षीय मुलीवर दु.११.४५ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. तिला हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

फुलाबाई हरिचंद्र कोठाले (वय ८) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या मुलीचे आई–वडील व नातेवाईक चिखलठाण येथील शेतात ऊस तोडणी करत होते.