उजनीतून सिंचनासाठी कालव्यात पाणी सोडण्यास तत्वत: मान्यता.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सिंचनासाठी कालव्यात सोडण्याबाबत केल्या सूचना.
टिम: विजयदिप न्यूज.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उजनी धरणामधून सिंचनासाठी कालव्यात सोडण्याबाबत सूचना दिल्या आहेत. १ नोव्हेंबर पासून उजनी उजवा व डावा कालवा तसेच भीमा-सीना जोड कालवा (बोगदा) यामधून सिंचनासाठी पाणी सोडण्यास तत्त्वतः मान्यता मिळाल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूरचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.
दरम्यान उद्या मंगळवार १७ ऑक्टोबर सकाळी ६ वाजलेपासून उजनी धरणाच्या मुख्य कालव्यातून १ हजार ५०० क्युसेक्सने करकंब व आष्टी तलावात पिण्याच्या पाण्यासाठी तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी सिंचनासाठी नसणार आहे. याचबरोबर २५ ऑक्टोबर च्या दरम्यान कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली जाणार असल्याचेही अधिक्षक अभियंता साळे यांनी सांगितले.
दुसरीकडे रब्बी हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु झालेला आहे. कालवा लाभक्षेत्रात पाण्याची टंचाई जाणवत असून पिके पाण्याच्या कमतरतेने जळून चाललेली आहेत. धरणातून कालव्यात तसेच बोगाद्यास सिंचनासाठी पाणी सोडण्यास विलंब केला जात असल्याने कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. रब्बी हंगाम सुरु झालेला असतानाही अद्यापपर्यंत रब्बीचे जाहीर प्रगटन काढण्यात आले नाही. त्यामुळे पाणी मागणी अर्ज भरले जात नाहीत व त्यास प्रशासनच जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
दरम्यान आज उजनीची टक्केवारी ६०.५६ टक्के आहे. तर धरणात एकूण पाणीसाठा ९६.१० टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ३२.४५ टीएमसी आहे.