उजनी धरण स्थिति चिंताजनक.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल ४९.७९ टीएमसी पाणीसाठा कमी.
विजयदिप न्यूज
जुलै महिन्याच्या अखेरीस पुणे जिल्ह्यात धरण पाणलोटक्षेत्र तसेच घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे उजनीत पाण्याची आवक सुरु झाली होती. परंतु सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड येथून येणाऱ्या विसर्गात घट झाली असून उजनीच्या पाणीसाठ्यात होणारी वाढ मागील २४ तासांपासून थांबलेली असल्याने तसेच लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे. उजनीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४९.७९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा कमी आहे.
उजनीच्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने भूगर्भातील पाणीपातळी खालावली असून विहरी कोरड्या पडल्या आहेत. तर बोअरवेल अखेरची घंटा मोजत आहेत. तसेच धरणात उपयुक्त पाणीसाठा कमी असल्याने कालव्यास पाणी नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत. तसेच उभी पिके पाणी मागत आहेत व एन पावसाळ्यात पिके माना टाकू लागली आहेत. तर नवीन ऊस लागवडी सुद्धा खोळबलेल्या असून उभ्या पिकांना पाण्याची तीव्र गरज असल्याने उजनीच्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.
मागील वर्षी १३ ऑगस्ट २०२२ रोजी उजनीत उपयुक्त पाणीसाठा ५६.८७ टीएमसी इतका होता. तर टक्केवारी १०६.१५ टक्के होती. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उजनीत तब्बल ४९.७९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा कमी आहे. तसेच मागीलवर्षी १३ ऑगस्ट २०२२ रोजी उजनीच्या सांडव्यामधून भीमा नदीत ६० हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात होते.
आज रविवार १३ ऑगस्ट सायंकाळी ६ वा. दौंड विसर्गात मोठी घट असून दौंडचा विसर्ग ७८५ क्युसेक्स इतका अत्यल्प झाला. तसेच उजनीत एकूण पाणीसाठा ७०.७४ टीएमसी, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ७.०८ टीएमसी असून धरण टक्केवारी १३.२२ टक्के आहे.