प्रामाणिक हेतू व कायद्याच्या चौकटीत राहून जनतेसाठी काम- डॉ.सई भोरे-पाटील
नुतून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सई भोरे-पाटील यांची माहिती.
टिम: विजयदिप न्यूज
प्रामाणिक हेतू व कायद्याच्या चौकटीत राहून जनतेसाठी काम करणार असल्याचा विश्वास अकलूज येथे नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सई भोरे-पाटील यांनी व्यक्त केला. अकलूजचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
डॉ.सई प्रताप भोरे-पाटील म्हणाल्या की, अकलूज येथील माझे हे तिसरे पोस्टिंग आहे. याआधी पुणे ग्रामीण, तुळजापूर आणि त्यानंतर आता अकलूजला पदभार स्वीकारला आहे. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन वर्तन करणाऱ्या प्रत्येकावर कायद्याचा धाक ठेवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील. जशी जनता असते तशी त्यांना पोलीस सेवा मिळते हे सूत्र देखील त्यांनी सांगितले.
अकलूज उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत अकलूज, माळशिरस, वेळापूर आणि नातेपुते ही चार पोलीस ठाणी व पिलीव आणि श्रीपुर पोलीस आऊट पोस्ट त्याचप्रमाणे माळीनगर पोलीस चौकीचा अंतर्भाव आहे. या सर्व ठिकाणी पोलीस सेवा सक्षम करणार असल्याची ग्वाही डॉ.सई भोरे-पाटील यांनी दिली.
यावेळी माळशिरस तालुक्यातील चंदन तस्करीचे जाळे, विद्युत पंपांच्या वारंवार चोरीला जाणाऱ्या केबल्स, बनावट दारू तयार करणे व विकणाऱ्यांचे रॅकेट, वेळापूर येथे वारंवार पकडला जाणाऱ्या अवैध गुटखा, निर्भया पथकामध्ये सक्षमता आणणे, अकलूज सह विविध शहरातील अवैध धंदे, मटका, रहदारीची समस्या आदी सर्व पोलीस सेवा संदर्भातील समस्यांवर पत्रकार व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सई भोरे-पाटील यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. जनतेने पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील डॉ.भोरे-पाटील यांनी केले.