'बहुत जनाशी आधारू, कर्मयोगी कल्पतरू' : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक. (मोठे मालक)
आमचे मोठे मालक म्हणजेच स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक. ज्यांनी आमच्या जीवनाला सुवर्ण झळाळी दिली असे परिस. १ जानेवारी २०१४ सालापासून १७ ऑगस्ट २०२० पर्यंत म्हणजेच साधारणतः ६ वर्ष ७ महिने १६ दिवस एवढा प्रदीर्घ काळ मला मालकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. हे मी माझे परमभाग्य समजतो.
मोठ्या मालकांनी पांडुरंग कारखान्याची उभारणी केली आणि अनेकांना ‘पदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी दिली. पदांच्या मोहात न गुंतता आपल्या सहकाऱ्यांना ‘चेअरमन’ पदाची जबाबदारी देऊन आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेतच राहण्यात ते धन्यता मानत होते. अखेर सर्वांच्या आग्रहाखातर कारखान्याचे ‘चेअरमन’ पद त्यांना स्वीकारावे लागले. ते कारखान्याचे चेअरमन झाले त्यावेळी, कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार मी स्वीकारला होता. माझ्या लेखी माझ्या आयुष्यातील तो एक सुवर्णयोग होता. मोठे मालक शिस्तप्रिय, निस्वार्थी वृत्तीचे, सहकारातील डॉक्टर असल्याचे मला ज्ञात होतेच. परंतु, मालकांचा स्वभाव, साधे राहणीमान, विचार, कर्तव्य-तत्परता, या बाबींची अनुभूती त्यांच्या सहवासातून आली. त्यांच्या समवेत आठवणींचे क्षण वेचता-वेचता माझ्या ज्ञानाची तिजोरी समृद्ध होत गेली.
मालकांसोबत काम करताना अनेकदा कारखान्याच्या कामाशिवायही अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. मालक जुन्या काळातील आठवणींना अनेकदा उजाळा द्यायचे. वसंतदादा पाटील यांचे विषयी बोलताना अनेकदा ते गहिवरून जायचे. स्वर्गीय इंदिरा गांधी, वसंतदादा पाटील, यशवंतरावजी चव्हाण साहेब, औदुंबरअण्णा, शंकरराव मोहिते पाटील यांच्यासह आदरणीय शरद पवार साहेबांसमवेत राजकारण आणि राजकारणात घडलेल्या अनेक घटना आठवणी मालक सांगायचे. त्या घटनांची तारीख, वार, वेळ आणि ठिकाण सुद्धा सांगायचे. स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि आदरणीय शरद पवार साहेब या व्यक्तिमत्त्वांविषयी त्यांच्या मनात अतिशय प्रेमाची, मायेची व आपुलकीची भावना त्यांच्या मनात होती. हे चर्चेतून जाणवायचे. अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सहकारातील घटनांचा साक्षीदार असणारे मालक आम्हाला जणू भूतकाळातील इतिहासाचे पैलू उलगडून सांगत.
त्यांच्यासोबत काम करताना आपुलकीचे ऋणानुबंध घट्ट होत गेले. त्यांच्याकडून नेहमीच प्रेम आणि वात्सल्याचा भडिमार व्हायचा. कोरोना काळात एक जुलै 2020 ला माझ्या वाढदिवसा दिवशी दिवसभर कॉलनीमधील माझ्या राहत्या घरी माझे गोड कौतुक करत ते बसून होते. कोरोनाचा कालखंड, ती भयावह स्थिती अशा विदारक काळात देखील ते माझ्या घरी बैठक मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी दिवसभर थांबले होते. माझी कन्या ‘मृणाल’ ही दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. मालकांना हे समजताच, ते स्वतः घरी आले. माझ्या मुलीला पेढा भरवून, त्यांनी आशीर्वाद दिला. असे ऋणानुबंध जपणारे मालक पुन्हा जन्माला येतील का?
पद, पैसा, गाडी, बंगला, केबिन अथवा कोणत्याही सुखवस्तूंचा त्यांना हव्यास नव्हता. सहकारात नावलौकिक असलेल्या ‘पांडुरंग’ सारख्या कारखान्याचे ते संस्थापक चेअरमन होते. परंतु, आयुष्यभर त्यांनी कारखान्याची गाडी सुद्धा वापरली नाही. आपल्या नेहमीच्या जुन्या गाडीतूनच ते प्रवास करायचे. संचालक मंडळातील अनेक सदस्य मालकांना नवीन गाडी घेण्याबाबत विनंती करायचे. कारखान्याचे संचालक स्वर्गीय श्री गवळी यांनी, एकदा संचालक मंडळाच्या बैठकीतच मालकांना नवीन गाडी घ्या. असा आग्रह धरला होता. त्यावेळी, त्यास विरोध करत मालकांनी निक्षून सांगितले होते की, “कारखान्याच्या पैशांची उधळपट्टी मी करणार नाही मी माझ्या जुन्या गाडीतूनच येणार. आपल्याला पटत असेल तर, सांगा. नाहीतर, मी चेअरमन पदाचा राजीनामा देतो.” सहकारातील हे किती दुर्मिळ आणि अपवादात्मक चित्र असेल. कारखान्याच्या व्यवस्थापनासाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली. या इमारतीत ‘चेअरमन’ साठी प्रशस्त व अध्ययवत केबिनची निर्मिती करण्यात आली. परंतु, मोठे मालक कधीच त्या केबिनमध्ये जाऊन बसले नाहीत. कारखान्यावर ते नेहमी यायचे आणि कार्यकारी संचालकांच्या केबिनमध्ये अभ्यंगतांसाठी असलेल्या खुर्चीत बसायचे. त्यांचे हे साधेपण पाहून मी भारावून जायचो. कशाचाही मोह आणि हव्यास नसणारे मालक हे सहकाराला लाभलेले नक्षत्रांचे लेणे होते.
त्यांच्या ‘चेअरमन’ पदांच्या काळात कारखान्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी केले. त्या प्रत्येक यशाचे श्रेय मोठ्या मालकांचेच होते. मात्र, प्रत्येक वेळी ते आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देत होते. अधिक गतीने काम करण्यासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन देत होते. त्यामुळे, असे विविध प्रकल्प नेहमीच राबविता आले. सौरऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, नवीन पेट्रोल पंप, वाखरी येथील माती परीक्षण प्रयोगशाळा, वाखरी येथील बायो फर्टीलायझर प्रकल्प, कारखान्यांमधील सुशोभीकरण, कारखान्याची गाळपक्षमता वाढविणे, कारखान्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, अत्याधुनिक व मनुष्यविरहित वजन काटा बसविणे. आदी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम मालकांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिले आणि यशस्वी ही झाले. नेहमीच आधुनिकतेची कास धरणारे मालक आमच्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जेचा महास्त्रोत होते.
ते सातत्याने कारखान्यावर येत असत. भेटत असत. त्या-त्या वेळी आम्हा सर्वांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायची. कोणतेही काम करण्यासाठी दुप्पट बळ मिळायचे. पाठीवरती आशीर्वादाचा हात ठेवत, केलेल्या कामाची त्यांच्याकडून शाब्बासकी मिळायची. “तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”. हेच जणू ते आपल्या कृतीतून आम्हाला सांगायचे. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रेमाने जोडणारे, आपुलकीने जवळ घेणारे आणि चांगल्या कामाचे तोंडभर कौतुक करत शाबासकीचा हात पाठीवर ठेवणारे मालक. आमच्या आयुष्यात आम्हाला लाभले हे आमचे परमभाग्य आहे.
कोरोना कालखंडात सहा ऑगस्ट २०२० रोजी कोरोना संसर्गामुळे त्यांना पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटल ला ऍडमिट व्हावे लागले. सुरुवातीचे चार-सहा दिवस त्यांची प्रकृती अतिशय चांगली होती. त्यामुळे ते फोनवरून संपर्कात होते. कृषी संस्कृतीत बळीराजाच्या लेखी महत्त्वाचा मानला गेलेला पोळा हा सण १८ ऑगस्टला होता. या पार्श्वभूमीवर, मालक हॉस्पिटल मधून सतत फोन करत होते. आणि, पोळ्यासाठी शेतकऱ्यांना ऊस बिलाचा हप्ता दिला पाहिजे. अशी सूचना करीत होते. १३ ऑगस्टला मालकांचा याच संदर्भाने फोन आला आणि मी दोन दिवसात पोळ्याच्या निमित्ताने द्यावयाचा उसाचा हप्ता वर्ग करतो. असे त्यांना सांगितले. १४ ऑगस्टला ही रक्कम आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली. मालकांच्या सूचनेनुसार, शेतकऱ्यांना पोळ्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया पार पाडली. परंतु, आमचे दुर्दैव की, त्याच दिवशी मोठ्या मालकांना उपचारासाठी आय.सी.यू. मध्ये हलविण्यात आले. त्यामुळे, शेतकऱ्यांना उसाच्या हप्त्याची रक्कम दिली आहे. हे त्यांना सांगता आले नाही. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत, “शेतकरी हिताय, कामगार सुखाय” या ध्येयाने अवघे जीवन व्यतीत करणारे मालक आमच्यासाठी दुर्मिळ अनुभूतींचा साक्षात्कार होते
आमच्या आयुष्यात मोठे मालक हे साक्षात ‘परीस’ होते. त्यांच्या सोबतच्या सहवासाने आमचे आयुष्याचे सोने झाले आहे. माझी पॅनल वरून कार्यकारी संचालक पदावर झालेली नेमणूक, त्यानंतर मिळालेले कित्येक पुरस्कार, अनेकविध संस्थांवर झालेल्या नियुक्ती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या नामांकित संस्थेकडून ‘सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक’ म्हणून प्राप्त झालेला सन्मान. हे केवळ आणि केवळ मोठ्या मालकांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन, पाठबळ, आणि आशीर्वादाचे फलित आहे. ही माझी नम्रधारणा आहे. आज मालक आमच्यात नाहीत. परंतु, त्यांच्या परिसस्पर्शाने उज्वल झालेलं आमचं हे भविष्य आयुष्यभर त्यांचे ऋणी आहे. जन्मभर त्यांच्या पादुकांची पूजा केली तरी, देखील त्यातून उतराई होणे शक्य नाही. असा ‘परीस’ आमच्या आयुष्यात पुन्हा लाभणे नाही.
डॉ. यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक
पांडुरंग सह. सा. का. लि, श्रीपूर