वेळापूर पोलिसांची मोठी कामगिरी.

अवैध्य गुटखा वाहतूक करणारे वाहनावर कारवाई; ४३ लाख ४३ हजार ८०० रुपयांचा गुटखा जप्त.
टिम: विजयदिप न्यूज.
वेळापूर (ता.माळशिरस) येथे शनिवार (दि. १ फेब्रुवारी) रोजी गुटख्याची अवैध्य वाहतूक करणारा टेम्पो पकडून यात ४३ लाख ४३ हजार ८०० रुपये किमतीचा अवैध्य गुटखा, २१ लाख रुपये किमतीचा टेम्पो तसेच १८ हजार रुपये किमतीचे मोबाईल असे एकूण ६४ लाख ६१ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल पकडण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वेळापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी प्रतिबंधित गुटखा भरलेले आयशर वाहन पंढरपूर कडून वेळापूर मार्गे पुणेकडे जात असल्याची माहिती मिळाली या मिळालेल्या माहितीच्या आधारे वेळापूर पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वेळापूर पालखी चौक येथे उड्डाणपुलाजवळ सापळा रचून सहा चाकी आयशार नंबर (एम.एच ११ डीडी ६५२७) हे वाहन थांबून चौकशी केली असता सदर वाहनात पाठीमागील हौदामध्ये मध्ये बारदानाच्या पोत्यामध्ये अवैधरित्या गुटखा असल्याचे दिसून आले.

सापडलेला गुटखा व वाहनाविषयी अन्नसुरक्षा विभागास कळवल्यानंतर अन्नसुरक्षा विभागाचे अधिकारी मंगेश लवटे यांनी वाहन व त्यातील गुटखा जप्त करून वाहनाचे मालक व जप्त केलेल्या मालाचे मालक यांच्यावरही वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
वाहन मालक व गुटख्याचे मालक यांची नावे अद्याप निष्पन्न झाली नाहीत तर सदर वाहनावर पोलीस कारवाई करीत असताना वाहनाचा चालक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील तपास वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि भाऊसाहेब गोसावी करीत आहेत.