‘रेक्रीएशन’चा जिद्दी विजय; १ विकेटने जालनावर थरारक मात.

संजना शिंदेची गोलंदाजीत कमाल.
टिम विजयदिप न्यूज.
महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित वरिष्ठ महिला गटाच्या एकदिवसीय आमंत्रित क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या उत्कंठावर्धक लढतीत रेक्रीएशन संघाने जालना संघावर अवघ्या १ विकेटने थरारक विजय मिळवत गट ‘बी’मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयासह रेक्रीएशनने ५ पैकी ४ सामने जिंकत ८ गुणांसह गुणतालिकेच्या शिखरावर आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

जालना संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद १२९ धावांची लढाऊ मजल मारली. रुतुजा काळे हिने ४२ चेंडूत ४६ धावांची आक्रमक खेळी करत डाव सावरला, तर जितेश्री दामले हिने २८ धावा करत साथ दिली. मात्र, रेक्रीएशनच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत जालनाचा डाव आटोपशीर ठेवला.
रेक्रीएशनकडून कर्णधार संजना शिंदे हिने जबरदस्त नेतृत्व करत ४ विकेट घेत सामन्यावर पकड मिळवली. तिला युक्ता मैतीने ३ विकेट घेत मोलाची साथ दिली.

१२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रेक्रीएशनची सुरुवात डळमळीत झाली. मधल्या फळीत श्रध्दा जगताप (२१), श्रेया जामखांडे (२०) आणि देवयानी वाडकर (१७) यांनी झुंज दिली. मात्र, जालनाच्या गोलंदाजांनी सातत्याने झटके देत सामना शेवटपर्यंत रंगवला.
सामन्याचा खरा थरार शेवटच्या क्षणी पाहायला मिळाला. अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत अक्षरा परदेशी आणि दर्शना चांदवट यांनी संयम राखत छोटी पण मोलाची भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. अखेर ४५.५ षटकांत ९ बाद १३० धावा करत रेक्रीएशनने नाट्यमय विजय साकारला.
गट ‘बी’च्या गुणतालिकेत रेक्रीएशन संघाचा ठसा उमटताना दिसत आहे.
५ पैकी ४ सामने जिंकत त्यांनी ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
सातत्यपूर्ण कामगिरी आणि संघभावनेच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले आहे.
यामुळे पुढील फेरीसाठी रेक्रीएशनचा दावा अधिक भक्कम मानला जात आहे.



