डॉ.यशवंत कुलकर्णी यांना डेक्कन शुगरचा “सर्वोत्तम कामगिरी” पुरस्कार जाहीर.

विजयदीप न्यूज: प्रतिनिधी
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांची प्रतिष्ठेच्या “सर्वोत्तम कामगिरी पुरस्कारासाठी” निवड झाली आहे. साखर उद्योगाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन इंडिया, पुणे यांच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा मानाचा हा पुरस्कार डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या नावावर जाहीर झाला आहे.
पुरस्कार समारंभ २२ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे एका भव्य कार्यक्रमात पार पडणार आहे. या समारंभासाठी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय साखर संस्थेच्या संचालक डॉ.सीमा परोहा, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, विस्मा संस्थेचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, एसटीएआयचे अध्यक्ष संजय अवस्थी, तसेच एसआयएसएसटीएचे अध्यक्ष एन. चिन्नप्पन यांसह साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी आपल्या कार्यकाळात कारखान्याच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ केली. त्यांनी कारखान्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध उत्पादनांमध्ये वाढ, ऊस विकासासाठी धोरणात्मक योजना, तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत. याशिवाय, कारखान्याच्या कोजनरेशन प्रकल्पाचा विस्तार करून ऊर्जा निर्मितीत भर टाकली आहे. गतवर्षापासून कारखान्याच्या आसवनी प्रकल्पामध्येही वाढ करण्यात आली असून हे प्रकल्प यशस्वीरीत्या चालवले जात आहेत. या सर्व कामगिरीची दखल घेत डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने त्यांना “सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार” देऊन गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ.कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने साखर उद्योगात नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
या यशामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा तसेच महाराष्ट्र साखर उद्योगाचा गौरव वाढला आहे. डॉ.कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, संचालक मंडळ, अधिकारी, कामगार वर्ग तसेच पांडुरंग परिवार यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.



