दिपोत्सव सामाजिक बांधिलकीचा…!

पंढरपूर मधील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पध्दतीने साजरी केली दिवाळी.

पंढरपूर विजयदिप न्यूज.
पंढरपूर मधील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली. सामाजिक बांधिलकी जपत झोपडीत, पालावर, घाटावरील निराधरांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली असून या उपक्रमाचे हे ३ रे वर्ष आहे.

भारतीय उत्सव परंपरेतील अतिशय महत्वाचा सण म्हणजे दिपावली प्रकाशाची नवऊर्जा बहाल करणारा हा सण देशभरामघ्ये अतिशय धुमधडाक्यामध्ये साजरा करण्याची परंपरा जोपासली जाते. दसरा ते दिपावली साधारण महिनाभर चालणाऱ्या या उत्सवाने देश लखलखत्या दिव्यांसह विद्युत रोषणाईसह उजळून निघतो. या काळात पसरलेल्या चैतन्याच्या वातावरणाने घराघरात आनंदाचे वातावरण पसरलेले असते. बालगोपालांसह घराघरात एक वेगळाच जोश असतो. फटाक्याची आतषबाजी, घराघरात बनवले जाणारे फराळाचे नाना विविध प्रकार, नव-नवे कपडे याची मोठी धूम असते दिवाळीचा सण म्हटला कि, मोठा खर्च केला जातो. कधी-कधी हा खर्च इतका अवाढव्य असतो की, अनेकांचे डोळे दिपतात.

एकुणच भारतीय जनमाणसाच्या आयुष्यात दिपावली सण आतिशय महत्वाचा आहे. जो तो दिपावली आपापल्या आर्थिक कुवतीनुसार साजरा करतो, पण समाजातील असाही एक घटक आहे जो घटक ३६५ दिवस पोटाची भूक भागवण्यासाठी रात्र-दिवस भटकत असतो, राब-राब राबत असतो. भटक्या समुहासह उपेक्षित, वंचित, आर्थिक दुर्बल घटकातील या भारतीय नागरिकांचा दरकोस दरमुक्काम उभा राहणार हा फाटका संसार तसा भारत आणि इंडियाच्या प्रक्रियेत कुठेच गणला जात नाही. या घटकाच्या सण परंपरा व त्याची रीत तशी निराळी. सण उत्सव आला कि गावा-गावात पाल ठोकलेल्या या घटकांतील छोटी मोठी लेकरं गावभर चार घरे हिंडुण आणलेले फराळ खाऊन सण म्हणून अगदी आनंदाने साजरा करतात.
पण माणूस म्हणून या घटकाच्या आयुष्यात दिपोत्सवाचा प्रकाश यावा यासाठी जर आपण प्रयत्न केले तर?झोपडीत, पालात, घाटांवर आपल आयुष्य खर्ची घालणाऱ्या गोर-गरीबांच्या सोबत त्यांच्या घरात साजरा करावा अशी कल्पना काही मित्रांनी मांडली आणि “EF2 ऋणानुबंध” पंढरपूरच्या सहकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करत हि कल्पना सत्यात उतरवली जसे की या वंचित घटकांना दिवाळी फराळ (लाडू,चिवडा,शेव, शंकरपाळी इ.) पणती, उटणे, तेल, साबण, लहान मुलांना फटाके आदि साहित्य सोबत घेऊन सर्वांनी या वंचित घटकांचा शोध महाद्वार घाट, दत्त घाट, नदी परिसर, मंदिर परिसर, जुने आणि नवीन बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि काही इतर जागी फिरून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली त्याच्या झोपडीत पालामध्ये पणती लाऊन त्यांचही जीवन उज्वल भविष्याच्या दिशेने प्रकाशमान होवो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना या “EF2 ऋणानुबंध” मधील सहकार्यांनी व्यक्त केली.

तसेच सर्वांची विचारपुस केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि फुललेल हास्य हे आमच्या कार्याची जनुकाही पोहोचपावती होती. त्यांनी दिलेले आशिर्वाद हे देवाच्या आर्शिवादा पेक्षा काही वेगळे नसावेत कदाचित बाकी राहिलेल्या रकमेत वृद्धाश्रम, बालकाश्रम इ. ठिकाणी थोडा फार मदतीचा हातभार लावण्याचा “EF2 ऋणानुबंध”चा प्रयत्न असेल. असे “EF2 ऋणानुबंध” च्या वतीने सांगण्यात आले.

हा सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सर्वांनी आपापल्या परिने या कार्यात योगदान दिले, सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे “EF2 ऋणानुबंध” च्या वतीने आभार, धन्यवाद व्यक्त करण्यात आले.