जुनी पेन्शन मिळवण्यासाठी राज्यव्यापी संघर्ष यात्रा.

२८ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे भव्य पेन्शन मेळावा.
टीम: विजयदिप न्यूज.
जुनी पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी कर्मचारी संघटना एकत्र येऊन राज्यभर पेन्शन संघर्ष याञा काढत असून अकलूज (ता.माळशिरस) येथे भव्य असा पेन्शन महामेळावा आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने कर्मचारी बांधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अरुण राठोड यांनी दिली यांनी दिली.
यावेळी पुढे बोलताना राठोड म्हणाले की, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्यातील ६० पेक्षा जास्त कर्मचारी संघटना एकत्र येऊन राज्यभर पेन्शन संघर्ष याञा काढत आहेत. ही यात्रा सोलापूर जिल्ह्यात २८ नोव्हेंबर रोजी येणार आहे (जत – सांगोला -अकलूज) त्या दिवशी अकलूज येथे भव्य असा पेन्शन महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी माहिती देताना संघटनेचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मिसाळ यांनी संगितले की, २२ नोव्हेंबर २०२१ रोजी आझाद मैदान, मुंबई येथून पेन्शन संघर्ष यात्रा सुरू झाली असून महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून ही संघर्ष यात्रा प्रवास करणार आहे. सहभागी सर्व संघटनांचे पदाधिकारी या संघर्ष यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत.
शिक्षण, महसूल, आरोग्य, तंत्र व उच्चशिक्षण, आयटीआय, भूजल सर्वेक्षण, ग्रामसेवक, वित्त संस्था, वनविभाग, जलसंपदा, पाटबंधारे, विद्यापीठ कर्मचारी इ.सर्व विभागातील कर्मचारी या संघर्ष यात्रेत सहभागी झाले आहेत. माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे २८ नोव्हेंबर रोजी संघर्ष यात्रेतील मार्गदर्शक मान्यवरांच्या उपस्थितीत पेन्शन मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त कर्मचारी बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली आसबे, जिल्हा प्रतिनिधी अमोल शिंदे, पांडुरंग वाघ, अर्जुन पिसे, तानाजी चव्हाण, संपत मिसाळ, संतोष पोतदार यांनी केले आहे.
१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी घेऊन संघर्ष यात्रा राज्यभरात जनजागरण करणार आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यु नि सेवा उपदानाचा लाभ देण्यात यावा. शेअर बाजाराच्या परताव्यावर आधारित अनिश्चित पेन्शन ऐवजी निश्चित रक्कमेची हमी असणारी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू व्हावी.
किरण काळे, जिल्हा सरचिटणीस
सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटना.