श्री पांडुरंग कारखाना येथे ऊस तोडणी यंत्राने तोडणी केल्यास येणाऱ्या पाचटाचा अभ्यास करणाऱ्या गटाची भेट.

टिम:विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना येथे ऊस तोडणी यंत्राने तोडणी केल्यास येणाऱ्या पाचटाचा अभ्यास करणाऱ्या गटाने भेट दिली. या अभ्यास गटामध्ये डॉ.सुभाष घोडके, डॉ.रामदास गारकर (शास्त्रज्ञ-मध्यवर्ती ऊस संसोधन केंद्र, पाडेगांव), पांडुरंग शेळके व सचिन हाटे (सह.संचालक, साखर आयुक्तालय, पुणे), संजय खताळ (म.रा.साखर संघ, मुंबई), प्रा.पी.पी.शिंदे (शास्त्रज्ञ, व्ही.एस.आय. पुणे) व डॉ.यशवंत कुलकर्णी (कार्यकारी संचालक, पांडुरंग सहकारी साखर कारखाना), अजित चौगुले (वेस्ट इंडियन शुगर मिल्स, पुणे), एस.एस.गंगावती (डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी, पुणे), न्यु हॉलंड व शक्तीमान कंपनी प्रतिनिधी, कृषीभूषण शेतकरी यांचा समावेश आहे.
देशात महाराष्ट्रातील साखर उत्पादनाचे प्रमाण सुमारे १/३ असून त्यामध्ये सतत वाढ होत आहे. तर दुसरीकडे तोडणी मजुरांची कमतरता जाणवू लागली असून तोडणीसाठी येणार्या मजुर, ठेकेदार वाहन मालक तसेच कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात अडव्हांन्स रकमा घेऊन ते ऊस तोडणीसाठी येतीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे वाहन मालक व कारखाने अर्थिक अडचणीत सापडत आहेत. यावर पर्याय म्हणून ऊस तोडणी यंत्राची निर्मिती झाली असून ऊस तोडणी करणेसाठी यंत्राचा वापर केल्यास ऊसाची तोडणी जमिनीपासून ते संपुर्ण पालापाचोळ्यासह होत आहे. यामध्ये पाचटाचे व वाड्याचे प्रमाण प्रत्यक्षात किती असते त्यासाठी किती कपात करणे गरजेचे आहे. याची तपासणी करुन अहवाल देणेसाठी मा.साखर आयुक्त यांचे मार्फत अभ्यास गट स्थापन करण्यात आलेला आहे. या अभ्यास गटाने गुरुवार १० फेब्रुवारी रोजी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ऊस फडामध्ये जावून ऊस तोडणी यंत्रणेमार्फत होत असलेल्या तोडीची प्रत्यक्ष पाहणीकरुन वजन काट्यावर पाचट व वाडे स्वतंत्र करुन त्याचे प्रत्यक्षात वजन करुन पाहणी अहवाल तयार केलेला आहे. याच पध्दतीने महाराष्ट्रातील इतर अनेक कारखान्याची प्रत्यक्षात पाहणी व तपासणी करुन अंतिम अहवाल दिला जाणार आहे.
यंत्राने तोडणी केलेल्या ऊसाचे गाळप करताना कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा येत आहे. त्यामध्ये संपुर्ण पाला-पाचोळ्यासह वजन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे अशा यंत्राणे ऊस तोड करुन कारखान्यावर गाळप केल्यास कारखान्याच्या साखर उताऱ्यावर विपरीत परिणाम होऊन कारखान्याचा साखर उतारा कमी होत आहे. गठीत समितीमधील एका गटाने ‘पांडुरंग सहकारी’च्या कार्यस्थळावर भेट देऊन तोडणी यंत्राणे तोडणी करीत असणाऱ्या प्लॉटवर प्रत्यक्ष भेट देऊन पाचट विलगीकरण व्यवस्था, तोडणी मजुरा करवी तोडणी केलेला प्लॉट व तोडणी यंत्राणे तोडणी केलेला प्लॉट याचा तुलनात्मक अभ्यास केला असून, परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसोबत ही चर्चा केली. त्यांच्या शंका समजावून घेतल्या तसेच कारखान्याच्या उस शेतीची, बेणे मळयासाठीच्या शेतीची पहाणी करून कारखाना परिसराचीही पहाणी केली यावेळी कारखान्याच्या विविध प्रकल्पाची व योजनांची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
समिती प्रमुख पांडुरंग शेळके यांनी ‘पांडुरंग सहकारी’ने राबविलेल्या विविध योजनांची व प्रकल्पांची प्रशंसा करुन कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी नेताजी पवार, कारखान्याचे केन मॅनेजर संतोष कुमठेकर, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, संगणक प्रमुख तानाजी भोसले आदि उपस्थित होते.