माळशिरस तालुक्यात सलग तिसर्या दिवशी कोरोनाचा विस्फोट.

टीम विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज रविवारी दि.११ एप्रिल रोजी आलेल्या अहवालानुसार तालुक्यात नव्याने १०६ कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे तालुक्यात एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आज अखेर ८७१ झालेली आहे. तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चाललेली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. रविवार दि.११ एप्रिल रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण तब्बल ८३८ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
मागील आठवड्यापासून माळशिरस तालुक्यात कोविड-१९ केसेस मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आजच्या दि.११ एप्रिलच्या अहवालानुसार तालुक्यात एकूण १०६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सलग तीन दिवस झाले तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत यामध्ये शुक्रवारी १४३ रुग्ण, शनिवारी १०२ रुग्ण तर आज रविवारी नव्याने १०६ रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व शक्यतो काम असेल तरच घराबाहेर पडावे.
डॉ.रामचंद्र मोहिते,
तालुका आरोग्य अधिकारी,
पंचायत समिती, माळशिरस.
