उजनीतून कालव्यास रब्बीचे आवर्तन सोडले, भीमा नदीत सुध्दा विसर्ग सुरू.

टीम विजयदिप न्यूज.
उजनी धरणामधून उजनीच्या मुख्य कालव्यात सिंचनासाठी रब्बी हंगामातील आवर्तन आज दि.२० जानेवारी रोजी दुपारी ४ वा. पासून सोडण्यात आले असून सुरवातीला ४०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. यात टप्प्या-टप्प्याने वाढ करण्यात येणार असून या रब्बी हंगामातील आवर्तनामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
उजनीतून भीमा नदीत सुध्दा विसर्ग सुरू.
सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणामधून भीमा नदीत मंगळवार दि.१९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजल्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पामधून १ हजार ६०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली होती.
दरम्यान आज बुधवार दि.२० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता धरणाच्या सांडव्यामधून सुध्दा १ हजार ३५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. वीजनिर्मिती प्रकल्पामधून १ हजार ६०० तर सांडव्यामधून १ हजार ३५० क्युसेक्स असा एकूण २ हजार ९५० क्युसेक्स विसर्ग भीमा नदीत सोडला जात आहे. यात टप्प्या-टप्प्याने वाढ करण्यात येणार असून तो १० हजार क्युसेक्स पर्यंत वाढविला जाण्याची शक्यता आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत उजनीत पाणीसाठा जास्त.
उजनी धरणाच्या पाणलोट तसेच लाभक्षेत्रात यावर्षी दमदार पाऊस झालेला होता. मागील वर्षी १ जून २०१९ ते २० जानेवारी २०२० पर्यंत उजनी धरणावरती एकूण ४३३ मी.मी पावसाची नोंद झालेली होती. तर यावर्षी १ जून २०२० ते २० जानेवारी २०२१ पर्यंत उजनी धरणावरती १ हजार १३ मी.मी पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी धरणावरती तब्बल ५८० मी.मी जास्त पाऊस झालेला आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट तसेच लाभक्षेत्रात यावर्षी दमदार पाऊस झालेला असल्यामुळे अद्यापपर्यंत लाभक्षेत्रात पाण्याची कमतरता जाणवलेली नसल्यामुळे कालव्यामधुन तसेच सोलापूर शहराच्या पाणी पुरवठयासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्याची गरज भासलेली नव्हती.
परिणामी धरणातील पाणीसाठा टिकून राहण्यास मदत झालेली असून मागील वर्षी दि.२० जानेवारी २०२० रोजी धरणात उपयुक्त पाणी साठा ५३.१६ टीएमसी एवढा तर धरणाची टक्केवारी ९९.२३ टक्के एवढी होती. त्यातुलनेत यावर्षी दि.२० जानेवारी २०२१ रोजी उपयुक्त पाणी साठा ५५.७८ टीएमसी एवढा तर टक्केवारी १०४.१२ टक्के एवढी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी धरणात २.६२ टीएमसी एवढा पाणी साठा जास्त आहे.
उजनी अपडेट दि.२० जानेवारी २०२०
पाणी पातळी | ४९७.०१५ मी. |
एकूण पाणी साठा | ३३८२.५७ द.ल.घ.मी, |
उपयुक्त पाणी साठा | १५७९.७६ द.ल.घ.मी, |
एकूण टीएमसी | ११९.४४ टीएमसी, |
उपयुक्त टीएमसी | ५५.७८ टीएमसी, |
टक्केवारी | १०४.१२%, |