सुखदेव साठे यांची श्रीपुर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी विजयकुमार देशमुख यांची नियुक्ती.
टिम विजयदीप न्यूज
श्रीपुर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुखदेव साठे यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. संघाच्या वार्षिक निवडणुकीत उपाध्यक्षपदी विनायक बागडे, तर सचिवपदी दादा माने यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्यकारिणीत पुन्हा एकदा अनुभवी आणि कार्यतत्पर नेतृत्वाची निवड झाल्याने पत्रकार बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्य, सोलापूर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीतही श्रीपुरातील पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी विजयकुमार देशमुख, तर श्रीपुर शाखेच्या अध्यक्षपदी सुखदेव साठे, उपाध्यक्षपदी विनायक बागडे आणि सचिवपदी दादा माने यांची निवड करण्यात आली.

दोन्ही संघटनांच्या मार्गदर्शक मंडळात ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब शिवशरण, महादेव जाधव आणि राजू मुलाणी यांचा समावेश असून त्यांच्या अनुभवाचा संघटनांना लाभ होणार आहे.
या निवडीनंतर कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यकारी निवडीचे नियुक्तीपत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सतिश सावंत, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, पत्रकार हितासाठी कार्य करण्याच्या शुभेच्छाही व्यक्त केल्या जात आहेत.



