महाराष्ट्र

‘पांडुरंग सहकारी’कडून वाहतुक ठेकेदारांना १२.५० टक्के वाहतुक दरवाढ.

टीम: विजयदिप न्यूज.

श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने मागील बऱ्याच दिवसापासून वाहतुक ठेकेदारांच्या वाहतुक दरवाढीबाबत असणाऱ्या मागणीबाबत तोडगा काढला असून कारखाना गळीत हंगाम २०२१-२२ या गळीत हंगामाच्या सुरुवातीपासून वाहतूक ठेकेदारांना १२.५० टक्के वाहतुक दरवाढ देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

कारखान्याची वाटचाल कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शावर उत्तमप्रकारे सुरु असून कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ सुरु झाला आहे. या हंगामात कारखान्याकडून ऊस गाळपास सुरवात झालेली असून पाठीमागील दोन वर्षापासून वाहतुक ठेकेदारांच्या डिझेल खर्चामध्ये वाढ झाल्याने त्यांनी डिझेल दरवाढ देणेबाबतची मागणी केली होती. सदरच्या मागणीस अनुसरुन व वहातुक ठेकेदारांच्या होणाऱ्या डिझेलवरील खर्चावर विचार करण्यात येऊन डिझेलचा दर व कारखान्याचा वाहतुक दर याचा समतोल साधत कारखाना व्यवस्थापनाने ही दरवाढ देण्याचे निश्चित केली आहे. असे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.

कारखान्याकडील तोडणी ठेकेदार यांची दरवाढ ही शासन स्तरावर होवून त्यांच्या दरवाढीची अंमलबजावणी करणेबाबत कारखान्यांना कळविण्यात येते. परंतु वाहतुक ठेकेदार यांना कारखाना स्तरावरच वाहतुक दरवाढ दयावी लागते. गतवर्षी तोडणी ठेकेदरांना ही त्यांच्या संघटनेने व शासनाने संयुक्तपणे तोडणी दरात वाढ दिली होती. त्याची अंमलबजावणी कारखान्यांनी पूर्वीच केलेली आहे. महाराष्ट्रातील वाहतुक संघटनांनी चालू वर्षी संपाचा इशारा दिला होता.  त्यापूर्वीच वाहतुक ठेकेदारांना वहातुक दरवाढ दिल्याने वाहतुक ठेकेदार खुष असून त्यांनी कारखान्यास सुरळीत ऊस पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. वाहतुक दरवाढीची अंमलबजावणी कारखाना गळीत हंगाम २०२१-२२ च्या सुरुवातीपासूनच करीत असल्याने या हंगामामध्ये वाहतुक ठेकेदारांना वाहतुक दरामध्ये जास्तीची रक्कम मिळून त्यांचा आर्थिक फायदा होणार आहे.

श्री.पांडुरंग कारखान्याने नेहमीच शेतकरी, तोडणी व वहातुक ठेकेदार यांचे हित जोपासले असून त्यांच्या पाठीशी उभा राहून अडी-अडचणीच्या वेळी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याप्रमाणेच याहीवर्षी वाहतुक ठेकेदारांना वाहतुक दरवाढ दिलेली आहे. यावेळी कारखान्याचे संचालक, अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!