इतर

महाळुंग ग्रामपंचायत निवडणुक ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था.

चार-आठ दिवसात अंतिम उद्घोषणा निघाली नाही तर; पुन्हा ग्रामपंचायतीसाठी निवडणुक कार्यक्रम.

टीम विजयदिप न्यूज.

            महाळूंग (ता.माळशिरस) येथील ग्रामपंचायत निवडणूकीबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रमवस्था असून निवडणुका होणार की नाही? झाल्या तर कधी होणार? व होणार असतील तर ग्रामपंचायतीसाठी होणार का? नगरपंचायतीसाठी होणार? याबाबत ग्रामस्थांमधून तर्क-वितर्क वर्तविण्यात येत आहेत. तर येत्या चार-आठ दिवसात नगरविकास विभागाकडून नगरपंचायतीसाठी अंतिम उद्घोषणा काढली, तर नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम राबविता येईल अन्यथा पुन्हा ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाकडून मिळत आहेत.

            राज्यात १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी जाहीर झाला तर १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. या टप्प्यातील ग्रामपंचायतीमध्ये महाळूंग ग्रामपंचायतीचा देखील समावेश होता. वास्तविक पहाता महाळूंग ग्रामपंचायतीचे नगरपंचायातीमध्ये रूपांतरीत करण्याची प्रक्रिया चालू असून ती अंतिम टप्प्यात आहे म्हणून या ग्रामपंचायतीची निवडणूक तीन महीने कालावधीसाठी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी शासनाच्या नगरविकास विभागाकडून राज्य निवडणुक आयोगाला  जा.क्र.एमयूएन-०-२०२०, प्र.क्र.४१५/नवि१८, दि.१६ डिसेंबर २०२० रोजी पत्र पाठवून करण्यात आली होती

आमच्या नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक तीन महीने पुढे ढकलण्याची विनंती केली होती, परंतु निवडणूक आयोगाकडून नियोजित कार्यक्रम पार पाडण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाला जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर निवडणूक आयोग पुन्हा दुसर्‍या वेळी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम राबवेल. परंतु जर का आमच्या नगर विकास विभागाकडून सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्याच्या अगोदर पूर्ण झाली तर नगरपंचायतीसाठी निवडणूक होऊन जाईल. आम्ही त्यांना तीन महिन्याची मुदत मागितली होती. अंतिम उद्घोषणा काढली तर राज्य निवडणूक आयोगाकडून विचार करू असेही सांगण्यात आले आहे.

स.ज. मोघे

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

नगर विकास, विभाग, मंत्रालय, मुंबई.

      परंतु निवडणूक आयोगाकडून नियमांनुसार राबविण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत महाळुंग ग्रामस्थांनी एक मताने निवडणुकीवरती  बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामस्थांनी या निवडणुकीसाठी एकही अर्ज न भरण्यामुळे ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी निवडणूक लागली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे व प्रशासक किती दिवस राहील हे अद्याप तरी सांगणे शक्य नाही.

नगरविकास विभागाने अंतिम उद्घोषणा लवकरात-लवकर काढणे आवश्यक आहे, येत्या चार-आठ दिवसात जर का नगरविकास विभागाने अंतिम उद्घोषणा काढली तरच आम्ही नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवू, अन्यथा चार-आठ दिवसात अंतिम उद्घोषणा काढली नाही तर आम्ही पुन्हा ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवू, ते करणे आम्हाला कायद्याने बंधनकारक आहे. व येत्या दोन महिन्यात पुन्हा ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागू शकते.

अविनाश सणस,

उपायुक्त,

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

            सद्य परिस्थितीचा आढावा घेता ग्रामपंचायतीसाठीच पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी साधारणपणे दोन ते तीन महिने कालावधी जाईल. जर का नगरविकास विभागाने येत्या चार-आठ दिवसात अंतिम उद्घोषणा जाहीर केली तरच नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. परंतु नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी सहा ते सात महिन्याचा कालावधी लागू शकतो कारण यासाठी नव्याने प्रभाग रचना व इतर बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमित प्रक्रिये प्रमाणे पुढील टप्प्यात ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागेल, हा प्रोग्रॅम सतत तीन-चार महिन्यांनी चालू असतो, तसेच जोपर्यंत महाळूंग ग्रामस्थांकडून निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला जात नाही. तोपर्यंत ही नियमित प्रक्रिया चालूच राहणार आहे. परंतु जर का नगरपंचायत प्रगटन झाले तर नगरपंचायत निवडणूक लागेल परंतु त्यासाठी पाच-सहा महिने कालावधी लागणार आहे. कारण नव्याने प्रभाग रचना व इतर प्रक्रिया करावी लागणार आहे.

जगदीश निंबाळकर,

तहसीलदार, माळशिरस.

      या सर्व घडामोडीत गावच्या विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता आहे. कारण सर्व घटनांचा विचार केला असता महाळुंग ग्रामपंचायतीचा कारभार इथून पुढे किमान सहा ते सात महीने प्रशासकाच्या हाती राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

महाराष्ट्र शासन व निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्ही महाळूंग ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागू नये व नगरपंचायतीसाठी निवडणूक लागावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केले आहे.

शरद मुंडफणे-पाटील,

महाळूंग.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!