धरण पाणीसाठामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

आ.बबनदादा शिंदे यांची शासनाकडे आग्रही मागणी उजनी लाभक्षेत्रातील पिके सद्यस्थितीत जगवण्यासाठी…

कालवा, बोगदा व सिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडण्यात यावे.

बेंबळे/ मुकुंद रामदाशी

उजनी धरण लाभक्षेत्रातील आहे ही पिके जगवण्यासाठी सर्व प्रकारच्या विसर्ग सिंचन क्षेत्रात तातडीने पाणी सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी आ.बबनदादा शिंदे यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली.

सोलापूर जिल्ह्यात पावसाळ्याच्या मागील दोन महिन्यात अतिशय कमी पाऊस झाला आहे. पुणे जिल्हा व भीमाशंकरचे डोंगरात काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उजनीच्या वरील १९ धरणात ९० ते ९५ टक्के पर्यंत पाणी साठा झालेला आहे व उजनी धरणात कमी अधिक प्रमाणात पाणी आल्यामुळे आजपर्यंत ऊणे -३६ पासून अधिक +१४% पर्यंत पाणी साठा झालेला आहे. सध्या धरणात उपयुक्त ७ टीएमसी पाणीसाठा झालेला असून धरणाच्या कालवा, बोगदा व सिंचन योजना लाभक्षेत्रातील ऊस, फळबागा, चारा-वैरण आदी पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहेत. यामुळे हजारो एकरातील उभ्या पिकांचे कोट्यावधी रुपयाचे पाण्याअभावी नुकसान होऊन शेतकऱ्यांचे अतोनात हाल होणार आहेत व यामुळे शेतकरी सध्या धास्तावलेला आहे.

उजनी संग्रहित छायाचित्र

उजनी धरणातून कालवा, भीमा-सीना जोड कालवा, सीना-माढा व दहिगाव सिंचन योजना याद्वारे पाणी सोडण्यात यावे. यापुढे भविष्यात धरणात पाणीसाठा वाढेल हे गृहीत धरून लाभक्षेत्रातील आहे ही पिके जगवण्यासाठी सर्व प्रकारच्या विसर्ग सिंचन क्षेत्रात तातडीने पाणी सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी आ.बबनदादा शिंदे यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे.

निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री ना.देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा कार्यकारी संचालक (पश्चिम महाराष्ट्र) कपोले, मुख्य अभियंता धुमाळ व जलसंपदा सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्याकडे मेलद्वारे पाठवलेल्या आहेत तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांची आगामी एक-दोन दिवसात आपण समक्ष भेट घेऊन चर्चा करणार आहोत. त्यांना वस्तुस्थिती दाखवून देणार आहोत व पाणी सोडण्यासाठी यांच्याकडे आग्रही राहणार असल्याचे आ.बबनदादांनी यावेळी आवर्जून सांगितले.

ऐन पावसाळ्यात उजनी कालवा लाभक्षेत्रातिल पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत.

१५ ऑगस्ट २३ रोजी उजनीत १४ टक्के पाणी असून ७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे व पाणीपातळी ४९२ मीटर पर्यंत पोहोचली आहे. सद्यस्थितीत भीमा सीना बोगदातून ९०० क्युसेक्स पाणी सोडण्यास व सीना-माढा आणि दहिगाव सिंचन योजना सुरू करण्यास कोणतीच अडचण येत नाही. याचप्रमाणे धरणाच्या भिंतीत असलेल्या कालव्याच्या दरवाजाची तळपातळी (एम डी डी एल लेव्हल) ४८७ मीटर पर्यंत खाली आहे व धरणातील पाणी पातळी ४९२ मीटर आहे, म्हणजेच कालवा दरवाजावर सध्या पाच मीटर दाबाने पाणी उपलब्ध आहे. म्हणून कालव्याद्वारे तीन हजार क्युसेक्स पाणी सोडून मुख्य कालवा, उजवा आणि डावा कालवा या लाखो एकर सिंचन क्षेत्रातील पिकांना शेतीसाठी पाणी देण्यास अडचण येत नाही हे स्पष्ट दिसत आहे. यामुळे जलाशयातून सोडल्या जाणारा विसर्ग सिंचन लाभक्षेत्रातील सध्या उपलब्ध असलेली लाखो एकरातील ऊस, फळबागा व इतर उभी पिके जिवंत राहतील व शेतकऱ्याचे कोट्यावधी रुपयांचे होणारे नुकसान टळले जाईल असे स्पष्ट मत आ.बबनदादा शिंदे यांनी व्यक्त करून सर्वांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

विशेष बाब नमूद करताना आ.बबनदादा शिंदे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे की सोलापूर जिल्ह्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी गाई, म्हशी पालन करत आहेत व जिल्ह्यात लाखो लिटर दुध उत्पादन होत आहे. कालवा, बोगदा आणि सीना माढा सिंचन योजना याद्वारे पाणी सोडल्यास हेच पशुपालक शेतकरी भविष्यकाळासाठी मोठ्या प्रमाणावर चारा वैरणीची लागण पेरणी करून जोपासना करतील व काही प्रमाणात भविष्यकाळात जनावरांच्या चारा वैरणीचा प्रश्न भेडसावणार नाही त्यामुळे सद्यस्थितीत धरणातून शेतीसाठी पाणी सोडणे अत्यंत गरजेची बाब झालेली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!