जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर यांचेकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या दुसर्या डोसचे नियोजन.
सलग चार दिवस होणार लसीकरण.
टीम विजयदिप न्यूज.
जिल्हा परिषद सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी १८-४४ वयोगटातील कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस ८ जून ते ११ जून असे सलग ४ दिवस दिला जाणार आहे असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे जाहीर केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागात मंगळवार दि.८ जून पासून पुढील ४ दिवस ऑफलाइन पध्दतीने नोंदणी करून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कोवॅक्सिन लसीचा दुसर्या डोसच्या लाभार्थी लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात आले आहे.
सदर लसीकरणाच्या वेळी नागरिकांनी कुठल्याही प्रकारची गर्दी गोंधळ न करता पहिला डोस झालेल्या लाभार्थींनी ज्या तारखेला पहिला डोस घेतला आहे. त्याच तारखेला दुसरा डोस घेण्यासाठी यापुर्वी पहिला डोस घेतलेल्या लसीकरण केंद्रावर जावून दुसरा डोस घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सोलापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
लसीकरणासाठी जाताना लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या वेळी तयार झालेला Beneficiaries ID किंवा पहिला डोस घेण्यासाठी नोंदवलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलसह उपस्थित राहावे. कारण लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांक वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो कोड टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बोराळे येथे पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे दुसरा डोस घेण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
१८-४४ वयोगटातील दुसरा डोस कोवॅक्सिन लाभार्थी लसीकरण नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
