‘पांडुरंग’ सहकारीचा दुसरा हप्ता १३१ प्रमाणे सभासदांच्या खात्यावर वर्ग.
टीम विजयदिप न्यूज.
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता १३१ रुपये प्रति मे.टन प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

कारखान्याने पहिला हप्ता रुपये २ हजार १०० प्रमाणे अदा केलेला असून गुरुवार दि.०८ जुलै रोजी रुपये १३१ प्रति मे.टन प्रमाणे दुसर्या हप्त्याची एकूण रक्कम १४ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलेली आहे. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाचे एकंदरीत प्रति मे.टन रुपये २ हजार २३१ प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली आहे.
श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये कारखान्याने १० लाख ६ हजार ७७० मे.टन ऊस गाळप करून ११.४४ टक्के सरासरी साखर उताराने ११ लाख १३ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन कारखान्याने उद्दिष्टपूर्ती केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कोविड-१९ संसर्गाच्या परिस्थितीमुळे आर्थिक संकटात असताना कारखान्याने मात्र गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता १३१ रुपये प्रति मे.टन प्रमाणे दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील हंगाम पुर्व मशागतीची कामे करण्याकरिता आर्थिक मदत होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाच्या एफ.आर.पी धोरणानुसार कारखान्याची एफ.आर.पी रुपये २ हजार ४३१ रुपये प्रति मे.टन असून कारखान्याने या गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसास रक्कम रु.२ हजार २३१ रुपये प्रति मे.टन अदा केले असुन उर्वरित एफ.आर.पी रक्कमही लवकरच देणार आहे.
गळीत हंगाम २०२१-२२ साठी कारखान्याकडे जवळपास १४ हजार हेक्टर ऊसाची नोंद असुन यामधुन ११ ते १२ लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेले आहे. गळीत हंगाम २०२१-२२ सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्यांमधील कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पूर्ण होऊन गाळप हंगाम वेळेवर सुरू केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षम पणे उभारली आहे असेही कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी म्हणाले.



