शेतीविषयक

वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची शंभरावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार.

सभासदांना दहा टक्के लाभांश वाटपाची घोषणा.

विजयदीप न्यूज: प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी गेली शंभर वर्षे सातत्याने कार्यरत असलेली वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी आता शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. या ऐतिहासिक प्रवासाचा ठसा उमटवणारी शंभरावी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन अमरसिंह माने-देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात नुकतीच संपन्न झाली.

सभेच्या प्रारंभी ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यवाहीला सुरुवात झाली. दिवंगत राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच संस्थेचे कार्यकर्ते आणि सभासद यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या योगदानाची आठवण ताजी करण्यात आली. त्यानंतर सचिव दीपक माळवदकर यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल वाचून दाखवला.

यावेळी सोसायटीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शताब्दी वर्ष भव्यदिव्य पद्धतीने साजरे करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. चेअरमन अमरसिंह माने-देशमुख यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती देताना सांगितले की, नफा विभागणीमधून सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप केला जाणार आहे. हा लाभांश थेट सभासदांच्या सेव्हिंग खात्यांवर जमा केला जाईल. ज्यांची खाती नाहीत त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, वेळापूर येथे तातडीने नवे खाते उघडावे, तसेच ज्यांची खाती बंद आहेत त्यांनी ती पुन्हा सुरू करून घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.

याशिवाय, सभेत मयत सभासदांच्या वारसांची नावे पुढील तीन महिन्यांच्या आत नोंदवून घेण्याचा ठरावही संमत करण्यात आला. सभेदरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन सभासदांनी मांडलेले प्रश्नांचे समाधान करण्यात आले.

सभेला व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे, संचालक मंडळातील आनंदराव माने-देशमुख, बाळासाहेब माने-देशमुख, चंद्रकांत क्षीरसागर, दत्तू तात्या माने, श्रीधर देशपांडे, अर्जुन भाकरे, विश्वजीत माने-देशमुख, हरिभाऊ मेटकरी, आप्पा आडसूळ आदींसह ज्येष्ठ सभासद पांडुरंग माने-देशमुख, मनोहर भाकरे, अरुण पवार, शहाजी कदम, महादेव पिसे, माणिक मदडे, देसाईकाका, राहुल माने-देशमुख, शिर्के, दाजी शंकर आडत, रंगादादा माने, महादेव बनसोडे, यशवंत देशपांडे, भीमराव मेटकरी, अशोक साबळे, ज्ञानेश्वर सोनवणे, तुकाराम मगर, रामचंद्र पिसे, चंद्रकांत पिसे, उमेश बनकर, श्यामकाका कदम, चंद्रकांत आडत, विलासराव बोधले, हरिभाऊ घोरपडे यांच्यासह गावातील मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या शेवटी आभारप्रदर्शन व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!