नियम व अटी लागू! ‘शिवजयंती’ साजरी करण्याबाबत गृह विभागाचे परिपत्रक.

सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इ. सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर निर्बंध.
टीम विजयदिप न्यूज.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थात ‘शिवजयंती’ यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने साधेपणाने साजरी करावी असे परिपत्रक राज्याच्या गृह विभागाने काढले असून पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इ. सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आज दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.
गड-किल्ल्यांवर जाऊन जयंती साजरी न करता घरी बसूनच शिवजयंती साजरी करावी उत्सव, सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करावी. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
तसेच कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यास बंदी करण्यात आली असून त्याऐवजी महारांजाच्या पुतळ्यास अथवा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व १० व्यक्तींच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याचबरोबर शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे उपक्रम राबविण्यास प्राध्यान्य देण्यात आले आहे. या आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सेनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात बाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोना संसर्गाचा प्रादृभाव कांहीसा कमी झाला होता, या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी खुल्या झाल्यामुळे शिवप्रेमींनी यावर्षीचा शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरवलं होतं. अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोज करण्यात आलं आहे, कांही ठिकाणी व्याख्यानं आयोजित केली गेली आहेत. परंतु गृहविभागानं नव्याने परिपत्रक काढून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.