कोवीड लसीकरणासाठी ग्रामपंचायत मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक – शमा पवार

टीम विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्यात कोवीड लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णात वाढ होत असून ही वाढ व गर्दी टाळण्यासाठी तसेच प्रत्येकाला नाव नोंदणीप्रमाणे लसीकरण व्हावे यासाठी आता १८ वर्षावरील नागरीकांनी ग्रामपंचायतीमध्ये लसीकरणासाठी नांव नोंदणी करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी केले आहे.
उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार १६ जानेवारी पासून सोलापूर जिल्ह्यात कोव्हीड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सूरू झालेली आहे. या मोहिमेंतर्गत वय वर्षे ४५ पुर्ण असलेले नागरिक लसीकरणास पात्र होते. तथापी १ मे पासून १८ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना प्रस्तुत लसीकरणास पात्र ठरविण्यात आलेले आहे. लाभार्थ्याने लसीकरणाकरिता कोवीन प्रणालीवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. तथापी लसीकरणास पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असुन बहूतांश लाभार्थी यांना संगणक हाताळणीचे ज्ञान नाही अथवा अॅन्ड्राइड मोबाईल नाही.
तसेच ४५ वर्षावरील बरेच लाभार्थी हे संगणक साक्षर नाहीत, त्यामुळे माळशिरस तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची कोवीन प्रणालीवर लसीकरणाची नोंदणी करणेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांनी शहरी भागासाठी मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी यांची नोंदणीसाठी नोडल ऑफिसर म्हणून नेमणुक केली आहे. माळशिरस व श्रीपूर- महाळुंग नगरपंचायतींसाठी मुख्याधिकारी, नगर पंचायत, माळशिरस यांचेकडुन व उर्वरीत गांवाकरिता गटविकास अधिकारी, माळशिरस यांचेकडुन कोवीन प्रणालीवर नोंदणीकामी अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करणेत येणार असून सोमवार पासून त्याठिकाणी तेच संनियंत्रण अधिकारी असणार आहेत.
सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत नागरिकांचे ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवक यांची राहणार आहे. तरी तालूक्यातील लसीकरण पात्र नागरिकांना आवाहन करणेत येते की, इच्छुक नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी न करता, संबंधित नगरपंचायत/ग्रामपंचायतीकडे नियुक्त कर्मचारी यांचेमार्फत कोवीन प्रणालीवर नोंदणी करुन घ्यावी. तसेच पात्र लाभार्थ्यांना स्वतः नोंदणी करणेसाठी https://selfregistration.cowin.gov.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सर्व गावांमध्ये लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करुन तशी नोंद रजिष्टरला घेवून त्याचे त्यांना टोकन देण्यात येणार आहे. टोकन नंबरप्रमाणे लाभार्थ्यास वैद्यकीय अधिकारी यांनी कळविल्यानंतर सदर लाभार्थ्यांना संबंधित लसीकरण केंद्रावर जाण्याचा निरोप संबंधित ग्रामपंचायत फोन करुन देणार आहेत. लसीकरणासाठी जरी एखाद्या व्यक्तीने स्वतःहुन ऑनलाईन नोंदणी केली असेल तरीही त्यांनी संबंधित ग्राममपंचायतीमध्ये नोंद करुन टोकन घेऊन जाणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायतीकडुन टोकन नेल्याशिवाय कोणीही लसीकरण केंद्रावर आल्यास त्यांना लसीकरण करण्यात येणार नाही, लसीच्या उपलब्धतेनुसार दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींसाठी काही लस राखीव ठेवण्यात येणार आहेत. पहिला किंवा दुसरा डोस घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी आपली नोंद संबंधित गांवामध्ये करुन टोकन घेणे अत्यावश्यक आहे.
शमा पवार,
उपविभागीय अधिकारी.