महाराष्ट्र

अपराजित महाराष्ट्र अंडर-23 महिला संघाचा ऐतिहासिक पराक्रम.

महाराष्ट्र अंडर-23 महिला क्रिकेट संघाने यंदाच्या बीसीसीआय स्पर्धेत दणदणीत आणि ऐतिहासिक कामगिरी करत विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता अपराजित राहण्याचा मान संघाने मिळवला आहे. या भव्य यशामुळे राज्यातील महिला क्रिकेटला नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.

या विजयानंतर संघाचे प्रशिक्षक हेमंत किणीकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. “हा विजय केवळ ट्रॉफीपुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक खेळाडूच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि संघभावनेचा हा सन्मान आहे,” असे ते म्हणाले.

संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, संघात उत्कृष्ट ऑलराउंडर खेळाडूंचा समावेश असल्याने प्रत्येक सामन्यात संतुलित संघरचना राखता आली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत संघाने सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी केली. कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून न राहता संपूर्ण संघाने जबाबदारी उचलली, हीच संघाची खरी ताकद ठरली.

स्पर्धेतील अपराजित कामगिरीबाबत किणीकर म्हणाले, “संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहणे सोपे नसते. प्रत्येक सामना नवे आव्हान घेऊन येतो. मात्र आमच्या खेळाडूंनी दबावाखालीही उत्कृष्ट खेळ करत प्रत्येक वेळी संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले.”

आपल्या वैयक्तिक अनुभवाबद्दल बोलताना ते भावुक झाले. “हा माझ्या आयुष्यातील पहिलाच असा अनुभव आहे. ११९२ साली रणजी ट्रॉफी फायनलमध्ये पंजाबविरुद्ध खेळलो होतो. त्यानंतरचा हा सर्वात संस्मरणीय क्षण आहे,” असे त्यांनी सांगितले.

संघ निवड प्रक्रियेबाबत त्यांनी स्पष्ट केले की, निवड पूर्णपणे पारदर्शक होती आणि प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता, कामगिरी व फिटनेस याच्या आधारेच संधी देण्यात आली. त्यामुळे योग्य व पात्र खेळाडू संघात स्थान मिळवू शकले.

या यशाचे श्रेय देताना त्यांनी संघातील प्रत्येक खेळाडूचे कौतुक केले. विशेषतः भाविका आहिरे हिने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला मजबूत आधार दिला. तिच्या कामगिरीमुळे अनेक सामन्यांमध्ये संघाला निर्णायक आघाडी मिळाली.

तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले. “गहुंजे येथील मैदानावर केलेल्या सरावाचा आम्हाला प्रत्यक्ष सामन्यांमध्ये मोठा फायदा झाला,” असे त्यांनी नमूद केले.

संघाच्या तयारीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, शारीरिक सरावाबरोबरच मानसिक तयारीवरही विशेष भर देण्यात आला. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढवणे, दबाव हाताळण्याची क्षमता विकसित करणे आणि कठीण परिस्थितीत शांत निर्णय घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या ऐतिहासिक विजयाचे औचित्य साधत किणीकर यांनी ही ट्रॉफी आपल्या कुटुंबीयांना आणि प्रेरणास्थानांना समर्पित केली. त्यांनी पत्नी साधना, गौरी, मुलगी शताक्षी, आई व बहीण दीप्ती तसेच गुरु स्वर्गीय माधवराव बापट यांना अभिवादन करत ही कामगिरी अर्पण केली.

तसेच PYC हिंदू जिमखाना, आपल्या कोचिंग सेंटर, फॅन क्लब, महाराष्ट्रातील जनता आणि भारतीय सैन्य यांचेही त्यांनी आभार मानले.

दरम्यान, महाराष्ट्र संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून या यशामुळे महिला क्रिकेटपटूंना नवी प्रेरणा मिळाली आहे. भविष्यात अधिकाधिक मुली क्रिकेटकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेवटी किणीकर म्हणाले, “हा विजय ही केवळ सुरुवात आहे. अजून मोठी स्वप्ने आहेत आणि त्यासाठी आम्ही अधिक मेहनत घेणार आहोत. महाराष्ट्र महिला क्रिकेटला देशात सर्वोच्च स्थान मिळवून देणे, हेच आमचे पुढील ध्येय आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!