कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पुण्यस्मरण सामाजिक उपक्रम, श्रद्धाभावाने साजरे.
सामाजिक उपक्रम, श्रद्धेचा आविष्कार आणि मान्यवरांची उपस्थिती.
विजयदीप न्यूज : प्रतिनिधी
“समाजासाठी जगणे, समाजासाठी कार्य करणे” हा जीवनमंत्र आपल्या आयुष्यभर जपणारे कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांचे पाचवे पुण्यस्मरण विविध सामाजिक उपक्रमांनी व श्रद्धाभावाने साजरे करण्यात आले. दिवसभर आयोजित धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांतून स्व.सुधाकरपंतांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराने पुण्यस्मरण सोहळ्याला सुरुवात झाली. शेतकरी, कामगार आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत २६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व.सुधाकरपंतांच्या समाजसेवेच्या परंपरेला सलाम केला. “इतरांना जीवनदान देणे हाच खरा पुण्यस्मरणाचा मार्ग” असा संदेश या उपक्रमातून प्रकर्षाने उमटला.

यानंतर ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांच्या कीर्तनातून स्व.सुधाकरपंतांचे व्यक्तिमत्त्व व कार्य उजागर झाले. यावेळी त्यांनी सांगितले “स्व.सुधाकरपंत हे शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे खरे लोकनेते आणि समाजसेवक होते. त्यांची कर्मयोगी वृत्ती आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहे.” ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांनी स्व.सुधाकरपंत यांचे समाजप्रेम, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि कर्मयोगी वृत्तीचे प्रभावी वर्णन करून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला.

दुपारी पांडुरंग परिवाराने स्व.सुधाकरपंतांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून कृतज्ञता व्यक्त केली. शेतकरी, कामगार, नागरिक आणि मान्यवर दिवसभर या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करत होते. यावेळी प्रत्येकाच्या मनात “आपलेपणाने जगलेला नेता” अशीच त्यांची आठवण जागृत होत होती.

यावेळी पुण्यस्मरण कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. त्यात अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, मार्केट कमिटीचे चेअरमन हरीशदादा गायकवाड, व्हा.राजूबापू गावडे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती सदस्य जळगावकर, पंचायत समिती सभापती जयश्री व्हरगर, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, धनश्री परिवार प्रमुख शिवाजीराव काळुंखे, ज्येष्ठ संचालक दिनकरराव यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे सदस्य, पांडुरंग कारखान्याचे व मार्केट कमिटीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याच्या यशामागे पांडुरंग कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांत परिचारक, युटोपियन शुगरचे उमेश परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी तसेच संचालक मंडळ, अधिकारी यांचे विशेष परिश्रम होते.
समाजासाठी जगलेले व्यक्तिमत्त्व
सुधाकरपंत परिचारक यांचे आयुष्य हे सामाजिक बांधिलकी, शेतकरीहित आणि विकासाचा ध्यास यांचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या कार्यामुळे अनेक संस्था, उद्योग व सामाजिक उपक्रम फुलले. आजही त्यांच्या विचारांची परंपरा समाजाच्या प्रेरणेसाठी दीपस्तंभ ठरते.



