नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके यांच्या मागणीला यश.

यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात.
पंढरपूर / प्रतिनिधी
उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून जलाशयातील अतिरिक्त पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर पंढरपूर-सांगोला रोड परिसरातील नागरिकांसाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला यशवंतराव चव्हाण तलाव (यमाई) तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा, अशी मागणी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.प्रणिता भालके यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती. मागणीची दखल घेत संबंधित अधिकारी यांनी तातडीने तलाव भरून देणेबाबत आदेश दिले.
यशवंतराव चव्हाण तलाव हा पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. तसेच पर्यटणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा तलाव आहे. सध्या तलावामध्ये अपेक्षित प्रमाणात पाणीसाठा नसल्याने परिसरातील विहिरी, बोअरवेल याची पाणी पातळी खालावली आहे. परिणामी नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तलावात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नगराध्यक्षा डॉ.भालके यांनी आपल्या निवेदनात नमूद केले होते.
पाणी सोडण्यात आल्याने यशवंतराव चव्हाण (यमाई) तलाव व परिसरातील विहिरी, बोअरवेल्स तसेच इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर परिसरातील शेती, पशुधन आणि नागरिकांच्या पाण्याच्या गरजा भागविण्यास मोठा हातभार लागणार आहे. तलावात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास तसेच जलचर व पक्ष्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासही मदत होणार आहे.



