माळशिरस तालुका

गिरीजा नाईकनवरे यांनी घेतला कलासमेठीत ‘शिकू आनंदे’ उपक्रमात अध्ययनाचा पाठ.

टीम: विजयदिप न्यूज.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आयोजित दर शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होणाऱ्या ‘शिकू आनंदे’ या शैक्षणिक कार्यक्रमात माळशिरस तालुक्यातील यशवंतनगरच्या रहिवासी व सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोंडले येथे कार्यरत असणाऱ्या गिरीजा मोहन नाईकनवरे यांनी २३ ऑक्टोबर च्या भागात कलासमेठीत अध्ययन यावर आधारित आकाशकंदील बनवण्यासाठी सुलभक म्हणून काम केले.

यावेळी गिरीजा नाईकनवरे यांनी रंगीत कागद तसेच ज्युटच्या पेपरपासून सुंदर व आकर्षक आकाशकंदील बनविणे याचे २० मिनिटे प्रात्यक्षिक दाखवले. गणित, परिसर अभ्यास, भाषा, समाजशास्त्र या विषयांशी सहसंबंध दाखवत जैविक शैक्षणिक साहित्याचा वापर करुन उपस्थितांची व राज्यभरातील विद्यार्थ्यांची मने जिंकली. या कार्यक्रमात राज्यातून आलेल्या १० शिक्षकांनी विविध व्यायाम प्रकार, न्रुत्य कौशल्य, गीतगायन, आकाशकंदील बनवणे आणि प्रश्नमंजुषा यांसारखे उपक्रम सादर केले.

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहावे, या हेतूने तत्कालीन शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सुरु झाला असून विद्यमान शिक्षण संचालक एम्.देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरु आहे. कलासमेठीत अध्ययनावर आधारित असणारा ‘शिकू आनंदे’ हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आवडीने पाहिला जातो. अनेक घरांमध्ये, शाळांमध्ये दर शनिवारी हा कार्यक्रम कृतीसह मुले करताना दिसतात, हेच या कार्यक्रमाचे मोठे यश आहे.

गिरीजा नाईकनवरे यांनी कोरोना काळात शिक्षण विभाग पंचायत समिती, माळशिरस यांनी राबवलेल्या लर्निंग फ्रॉम माळशिरस, आनंददायी शाळा, संडे-फंडे, पारावरची शाळा यांसारख्या उपक्रमात लक्षवेधी कार्य केले आहे. मैत्री अक्षरांशी, चला रांगोळी काढूया, घेऊ शिक्षण कलेतून, आली माझ्या घरी ही दिवाळी यांसारखे कलाशिक्षणावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. आनंददायी शाळेच्या माध्यमातून ‘ध्यास आनंददायी शिक्षणाचा, ध्यास गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा…’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन, शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा, स्नेहसंमेलन, फँन्सी ड्रेस स्पर्धा, कृतीयुक्त बडबडगीते, भारतीय संस्कृती ची ओळख यांसारखे सहशालेय उपक्रम या काळात यशस्वीपणे घेतले आहेत.

या विशेष सहभागाबद्दल गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, सभापती शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी महालिंग नकाते, केंद्रप्रमुख आनंद कचरे, मुख्याध्यापक नवनाथ कवडे, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!