इतर

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत श्री साई हायस्कूलच्या मुलींची सुवर्णभरारी!

पुणे विभागाचा पराभव करत कोल्हापूर विभागाला राज्यस्तरीय विजेतेपद; सुहानी कहांडळ मालिकावीर व सामनावीर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे २१ ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर विभागाने अंतिम सामन्यात पुणे विभागाचा दणदणीत पराभव करत राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, कोल्हापूर विभागाचे नेतृत्व श्री साई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने केले. या ऐतिहासिक विजयामुळे श्री साई हायस्कूलच्या मुलींनी क्रीडा क्षेत्रात सुवर्णभरारी घेत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात कोल्हापूर विभागाने लातूर विभागावर दणदणीत विजय मिळवत विजयी सलामी दिली. लातूर विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर विभागाने निर्धारित १० षटकांत १२१ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये सुहानी कहांडळ हिने अवघ्या १८ चेंडूंत ५० धावा फटकावत शालेय स्पर्धेतील जलद अर्धशतकाची नोंद केली. तिने ५७ धावांची नाबाद खेळी साकारली. तिला साथ देताना मयुरी थोरात हिनेही २५ चेंडूंत ५३ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना लातूर विभागाचा संघ निर्धारित १० षटकांत ३ बाद २१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. कोल्हापूर विभागाकडून सायली पाटील, आदिती राऊत व तन्वी पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

उपांत्य फेरीत नाशिकवर मात

उपांत्य फेरीच्या सामन्यात कोल्हापूर विभागासमोर नाशिक विभागाचे आव्हान होते. कोल्हापूर विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरच्या भेदक गोलंदाजीसमोर नाशिक विभागाचा संघ निर्धारित १० षटकांत ७ बाद ५४ धावाच करू शकला. तन्वी पाटील व सुहानी कहांडळ यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर संस्कृती रसाळे, आदिती राऊत व मयुरी थोरात यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. विजयासाठी आवश्यक असलेल्या ५५ धावा कोल्हापूर विभागाने सहज पूर्ण केल्या. सुहानी कहांडळ हिने नाबाद २४, तर मयुरी थोरात हिने १८ धावांचे योगदान दिले.

अंतिम सामन्यात पुणे विभागाला नमवत विजेतेपदावर मोहोर

अंतिम सामना कोल्हापूर विभाग व पुणे विभाग यांच्यात रंगला. पुणे विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोल्हापूरच्या प्रभावी गोलंदाजीसमोर पुणे विभागाचा संघ निर्धारित १० षटकांत ७ बाद ६२ धावाच करू शकला. कोल्हापूरकडून सुहानी कहांडळ हिने सर्वाधिक तीन बळी घेतले. तन्वी पाटील हिने दोन, तर सायली पाटील व संस्कृती रसाळे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

विजयासाठी ६३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कोल्हापूर विभागाने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या सात षटकांत बिनबाद ६३ धावा पूर्ण केल्या आणि राज्यस्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले. यामध्ये सुहानी कहांडळ हिने ४३ धावांची नाबाद खेळी साकारली, तर संस्कृती रसाळे हिने १५ धावांचे मोलाचे योगदान दिले. संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सुहानी कहांडळ हिला मालिकावीर व अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

या संघाला श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग ब्रोंद्रे, प्राचार्या सौ. एम. एस. पाटील, क्रीडा मार्गदर्शक श्री. सरदार पाटील, सौ. वर्षाराणी पाटील, श्री. विनायक पवार तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्रीडा निरीक्षक श्री. सचिन पांडव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विजयी संघातील खेळाडू : कर्णधार सुहानी कहांडळ, उपकर्णधार संस्कृती रसाळे, मयुरी थोरात, सायली पाटील, स्नेहा पटेल, आदिती राऊत, सोनल माने, पायल माने, अंबिका वाबळे, जान्हवी चौगुले, ध्रुवा पाटील, तन्वी पाटील व निसर्गा महाजन.

श्री साई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी राज्यस्तरावर मिळविलेल्या या देदीप्यमान यशाबद्दल शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!