इतर

शि वॉरियर्सचा दणदणीत विजय; रॉयल स्ट्रायकर्सवर ८ गडी राखून मात.

आराध्या बोटवेचे नाबाद अर्धशतक, मधुरा व स्वराली इंगळेची भेदक गोलंदाजी

पुणे प्रतिनिधी

रॉयल स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकांत ९ गडी गमावून ९१ धावा केल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना शि वॉरियर्सने अवघ्या १७.३ षटकांत २ गडी गमावून ९४ धावा करीत अंतिम सामन्यात बाजी मारली.

नाणेफेक जिंकून रॉयल स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शि वॉरियर्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा करीत रॉयल स्ट्रायकर्सच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. कर्णधार लावण्या देशवांडीकर आणि अनुष्का वाकोडे यांनी प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले. लावण्याने १३ चेंडूंत तीन चौकारांसह १३ धावा केल्या, तर अनुष्काने २१ चेंडूंत एका चौकारासह १३ धावा केल्या.

त्यानंतर रॉयल स्ट्रायकर्सच्या फलंदाजीची घसरगुंडी सुरू झाली. मधुरा आणि स्वराली इंगळे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करीत रॉयल स्ट्रायकर्सच्या फलंदाजीला मोठे धक्के दिले. कल्याणी कुटेनेही एक गडी बाद केला. रॉयल स्ट्रायकर्सच्या डावात तब्बल ४३ धावा अतिरिक्त मिळाल्या. तरीही संघाला ९१ धावांपुढे मजल मारता आली नाही.

मधुराने चार षटकांत अवघ्या ७ धावा देत तीन गडी बाद केले. तिची गोलंदाजी विशेष प्रभावी ठरली. स्वराली इंगळेनेही चार षटकांत ११ धावा देत तीन गडी बाद केले. दोघींच्या अचूक माऱ्यामुळे रॉयल स्ट्रायकर्सच्या फलंदाजांना मोठ्या भागीदारी करता आल्या नाहीत.

९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शि वॉरियर्सची सुरुवात सावध झाली. श्रावणी कातकडे ३१ चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने ८ धावा केल्या. त्यानंतर आराध्या बोटवेने जबाबदारी स्वीकारत शानदार नाबाद अर्धशतक झळकावले. तिने ५० चेंडूंचा सामना करताना सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५२ धावा केल्या. तिचा स्ट्राइक रेट १०४ इतका राहिला.

आराध्याला मधुराने १० चेंडूंत ४ धावांची साथ दिली. मधुरा बाद झाल्यानंतर स्वराली इंगळेने नाबाद दोन धावा करीत आराध्यासोबत संघाला विजयापर्यंत नेले. शि वॉरियर्सने १७.३ षटकांत ९४ धावा करीत ८ गडी राखून विजय मिळविला.

अंतिम सामन्यात आराध्या बोटवेची नाबाद अर्धशतकी खेळी आणि मधुरा व स्वराली इंगळेची प्रत्येकी तीन बळींची प्रभावी कामगिरी शि वॉरियर्सच्या विजयाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत सरस कामगिरी करीत शि वॉरियर्सने अंतिम सामन्यात आपले वर्चस्व सिद्ध केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!