वेळापूर पोलिसांनी मध्यप्रदेश गँग रेप प्रकरणातील आरोपीला पकडून मध्यप्रदेश पोलिसाच्या दिले ताब्यात!

टिम: विजयदिप न्यूज
वेळापूर (ता.माळशिरस) परिसरात वेळापूर पोलिसांनी मध्यप्रदेश गॅंग रेप प्रकरणातील आरोपीला पकडून मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती वेळापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांनी दिली, वेळापूर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेशातील कोतवाली पोलीस स्टेशन जिल्हा उमरिया रीवा गाव परिसरात ७ जणांनी केलेल्या गॅंग रेप प्रकरणातील गुन्हा रजिस्टर २३,२१ भा.द.वि कलम ३६३, ३६६ अ, ३७६(३), ३७६ डी ए, ५०६, ३७६(२)w अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली होती. या गुन्ह्यातील ७ पैकी ६ आरोपिंना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी दोन वर्षापासून रोहित प्यारेलाल यादव (वय २५, रा. रिवा) मध्यप्रदेश हा फरार होता.

मध्यप्रदेश पोलिसांना सदर आरोपी सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे असल्याची तांत्रिक माहिती मिळाल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक सरिता ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार गुटेर, पोलीस कॉन्स्टेबल रोशन चव्हाण सदरची पोलीस टीम वेळापूर पोलीस स्टेशन येथे हजर होऊन वरील आरोपी बाबत चर्चा केली.
सदर आरोपी वेळापूर परिसरात असल्याचे वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांना माहिती व ठिकाण कळताच अकलूज उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतची योग्य ते नियोजन करून वेळापूर पोलीस स्टेशन पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल जनार्दन करे, पोलीस कॉन्स्टेबल विश्वंभर थिटे व मध्यप्रदेश पोलीस पथक यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वेळापूर मधील त्या परिसरात जाऊन या गुन्ह्यातील आरोपीला काम करत असताना त्याला जागेवरच पकडले व वेळापूर पोलीस स्टेशन येथे आणून वेळापूर पोलिसांनी त्याला मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले.