भविष्यात ड्रोन यंत्राद्वारे पिकांवरती कीटकनाशके तसेच अन्य प्रकारची औषध फवारणी करणे काळाची गरज – कृषिकन्या

चौंडेश्र्वरवाडी येथे ड्रोन द्वारे ऊस पिकावर औषध फवारणीचा यशस्वी प्रयोग.
टिम: विजयदिप न्यूज.
भविष्यात ड्रोन यंत्राद्वारे शेत पिकांवरती कीटकनाशके तसेच अन्य प्रकारची औषध फवारणी करणे काळाची गरज असल्याचे मत रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी व्यक्त केले. त्या चौंडेश्र्वरवाडी (ता.माळशिरस) येथे ड्रोनद्वारे फवारणी कशी करायची याचे शेतकर्यांना प्रात्यक्षिक दाखवताना बोलत होत्या.
जशी पिढी बदलत आहे तसेच दिवसें-दिवस तंत्रज्ञानात देखील बदल होताना दिसत आहेत यामध्ये शेतीशी निगडीत असणारे तंत्रज्ञान देखील मागे नाही. शेतकरी आता शेतीच्या पारंपारिक असणार्या तंत्रज्ञानात बदल करून उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसत आहे. शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही.
कीड नियंत्रणासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी फवारणी यंत्र सर्वात महत्वाचे मानले जाते. पारंपरिक पद्धतीने शेतकरी पाठीवर फवारणी यंत्र घेऊन शेतात फवारणीपासून ते पॉवर्स प्रे, ट्रॅक्टर ब्लोअरद्वारे फवारणी करतात. आता मात्र ड्रोन यंत्राद्वारे थेट फवारणी करणारे तंत्रज्ञान आल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
ड्रोन तंत्रज्ञानाबाबत शेतकर्यांना माहिती व्हावी या उद्देशाने ड्रोनद्वारे फवारणी कशी करायची याचे प्रात्यक्षिक रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी चौंडेश्र्वरवाडी येथील बाळासाहेब माने-देशमुख यांच्या शेतात घेण्यात आले. यावेळी अवघ्या ७ मिनिटात १० लिटर मध्ये ड्रोन द्वारे एक एकर क्षेत्राची फवारणी करण्यात आली.
ड्रोनयंत्राद्वारे फवारणी केल्याने शेतकऱ्यांना विषबाधा होत नसून मजुरांची अडचण होणार नाही व पर्यावरणाचे देखील नुकसान होणार नाही. यामुळे भविष्यात ड्रोन यंत्राद्वारे फवारणी काळाची गरज असल्याचे मत कृषी कन्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कृषी कन्या स्नेहल शिंदे, प्राची जाधव, रोहिणी कांबळे, पूजा घाडगे, कोमल देवकते, प्रगती सालगुडे, काजल वळकुंडे, अपेक्षा धापटे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले व आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व उपस्थित शेतकर्यांना पटवून दिले.
प्रात्यक्षिकासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी.नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम एकतपूरे, कार्यक्रम अधिकारी एच.एस खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.