महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

वैद्यकीय क्षेत्रात ४० वर्षात तब्बल ४१ हजार प्रसूती करणारे ‘तेजोमय’ डॉ.सतीश दोशी.

विजयदिप न्यूज

आपल्या वैद्यकीय सेवेत ४० वर्षांत ४१ हजारांपेक्षा जास्त प्रसूत्या करणाऱ्या विख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ.सतीश दोशी यांनाही चांगला भाष्यकार लाभल्याने त्यांचे कर्तुत्व जगाला माहीत होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले. अकलूजचे डॉ.सतीश दोशी यांच्या जीवनावरील ‘तेजोमय’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात डॉ. पाटील बोलत होते.

अकलूज येथील विख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ.सतीश दोशी यांच्या संघर्षमय वाटचालीचा वेध घेणारे ‘तेजोमय’हे पुस्तक डॉ. स्वप्नाली काटकर यांनी लिहिले आहे. त्याचे प्रकाशन आज अकलूज येथे झाले.

समारंभात पुढे बोलताना डॉ.रावसाहेब पाटील म्हणाले की, मानवी आयुष्य कधी ना कधी व्याधीग्रस्त होतेच. त्या व्याधीतून माणसांना मुक्त करणाऱ्या डॉक्टरांना प्रतिदेव म्हणून संबोधले जाते डॉ.सतीश दोशी यांनी आपल्या ४० वर्षांच्या वैद्यकीय सेवेत ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या तत्त्वापासून कधीही ते दूर गेले नाहीत. पैशाने श्रीमंती येते हे साफ चुकीचे आहे. ज्याला माणसं आणि सामाजिक आदर मिळवता येतो तोच खरा श्रीमंत असतो असे डॉ.पाटील यांनी सांगितले.

डॉ.दोशी याच्या आयुष्यातील सर्व पौर्णिमा या पुस्तकात एकत्र करून त्यांचे ‘तेजोमय’ कर्तृत्व समाजासमोर आणण्याचे काम लेखिका डॉ.स्वप्नाली काटकर यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

संघर्ष करावा लागतो तेव्हाच क्रांती घडते. पैसा धनसंपत्तीची वाटणी वारसाहक्काने करता येते, परंतु कर्तुत्व वारसा हक्काने वाटून येत नाही. ते स्वतःला सिद्ध करावे लागते. हे डॉ.सतीश दोशी यांनी समाजाला दाखवल्याचे प्रा.प्रमोद शहा यांनी सांगितले. यावेळी डॉ.सुनेत्रा व डॉ.सतीश दोशी या उभयतांचा विशेष सन्मान करण्यात आला.

आपल्या ४० वर्षांच्या वैद्यकीय सेवेत डॉ.सतीश दोशी यांनी तब्बल ४१ हजार महिलांच्या प्रसूती करण्याचा विक्रम केला असल्याचे डॉ.एम.के इनामदार यांनी सांगितले. ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्या आयुष्याला कसलंही मोल नसतं. डॉ.सतीश दोशी यांनी आपल्या आयुष्यात कृतज्ञता कधीच बाजूला केली नसल्याचे डॉ.इनामदार यांनी सांगितले. त्यांचे अनेक पेपर्स वैद्यकीय क्षेत्रात समाविष्ट आहेत.

या कार्यक्रमास प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के इनामदार, डॉ.राजीव राणे-कविटकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर्स प्रा.दिलीप भालेराव, जेष्ठ समाजसेविका शोभना शहा, लेखिका अनुपमा पंडित, डॉ.प्राजक्ता मेहता, डॉ.हेमंत शेट्टी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ.राजीव राणे-कविटकर, डॉ.विद्युत शहा आदी डॉक्टरांनी डॉ.दोशी यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन डॉ.सुधीर पोफळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!