माळशिरस तालुका

अकलूज पोलिस स्टेशन हद्दीत सापडले अनोळखी महिलेचे प्रेत.

टिम:विजयदिप न्यूज

अकलूज (ता.माळशिरस) पोलिस स्टेशन हद्दीतील विझोरी गावाच्या शिवारात शेतजमीन गट नंबर १०८ मध्ये असणार्‍या ऊस पिकातील सरीमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेलेल्या अवस्थेत दिसून आल्याची फिर्याद विझोरी येथील शेतकरी युवराज शिवाजी काळे (वय वर्ष ३९) यांनी अकलूज पोलिसात दिली असून अनोळखी महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. फिर्यादीच्या जवाबावरून अकलूज पोलीस ठाण्यात अज्ञातविरुद्ध ४८१/२०२२ भा.दं.वि.सं.क ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती अकलूजचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.

याबाबत घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, विझोरी (ता.माळशिरस) गावच्या शिवारात शेत जमीन गट नंबर १०८ मधील ऊस पिकातील सरीमध्ये खत टाकत असताना फिर्यादी युवराज शिवाजी काळे यांना एकदम उग्र वास आला. त्यावेळी फिर्यादीने वास येत असलेल्या दिशेने पाहिले तेव्हा एक व्यक्‍ती झोपलेल्या अवस्थेत दिसली म्हणून जवळ जाऊन पाहिले त्यावेळी त्यांना एक अनोळखी महिला वय अंदाजे ३० ते ४० वर्ष असलेली उताणे स्थितीत मयत अवस्थेत पडलेली दिसली. तिचे शरीर सडलेले व पोट फुगलेले दिसून आले व त्याचा वास येत होता. तसेच चेहऱ्यावर व अंगावर आळ्या व माशा असून तिच्या अंगात काळ्या रंगाचा कुडता, गळ्यावर लाल रंगाची ओढणी तसेच बाजूस पांढऱ्या रंगाची पॅन्ट (सलवार), पडलेली दिसत आहे. याचबरोबर डाव्या हातात लाल दोरा व लाखेचा चुडा असून हातावर ‘सविता’ हे नाव गोंदलेले आहे.

तसेच दोन्ही पायात पांढरे धातूचे जोडवी व बाजूला एक सॅडल पडलेली असून सदर महिलेची उंची पाच फूट दोन इंच आहे. याचबरोबर महिलेपासून पूर्व बाजूस मोकळ्या जागेत कांही अंतरावर एक सॅडल त्यापुढे कांही अंतरावर जमिनीवर व दगडाला रक्‍ताचे काळपट डाग दिसत आहेत.

सदरची महिला कोण आहे? याबाबत गावात व आजूबाजूच्या परिसरात माहिती घेतली परंतु तिचे नाव पत्ता समजून आला नाही म्हणून फिर्यादीची खात्री झाली की, सदर अनोळखी महिलेस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून कशाने तरी मारून गंभीर जखमी करून खून करून तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचे उद्देशने उसाचे सरीमध्ये टाकून दिले आहे. म्हणून अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार आहे.

पुढील तपास अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!