वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत मोकाट फिरणाऱ्यांची होणार कोरोना रॅपिड टेस्ट

वेळापूर पोलीस व आरोग्य विभाग करणार चाचणी.
टीम विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अकलूज येथे बैठक घेऊन कडक कारवाई करणे बाबत आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने तालुक्यातील मोठ्या गावात जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे.
जनता कर्फ्यु मध्ये ही काही तरुण हे मोकाट फिरताना दिसत असून त्यांचेवर पोलीस कारवाई ही करीत आहेत. असे असताना आता वेळापूर येथे मोकाट व विनाकारण फिरणाऱ्यांची वेळापूर पोलीस व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागेवरच कोविड ची रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे.
याबाबत आज दि. २५ मे रोजी वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोकॉ महेश पोरे व वेळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बापूराव ओव्हाळ व डॉ. अजिंक्य बंडगर यांची प्राथमिक आरोग्य केंद्र वेळापूर येथे बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन केले असून विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, ज्या कामासाठी घराबाहेर पडला आहे ते काम अत्यावश्यक असणे आवश्यक आहे, त्याबाबत योग्य ती माहिती चेकपोस्ट वरती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले असून जे लोक अत्यावश्यक सेवेत आहेत त्यांनी आपले ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
१६ गावात होणार जागेवरच तपासणी !
वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत एकूण १६ गावे येतात. यामध्ये वेळापूर, मळोली, साळमुख, निमगाव, खंडाळी, तोंडले, बोंडले अशी मोठी गावे आहेत. या सर्व गावात बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची जागेवरच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सोबतच मुख्य चौक, बाजारपेठ, वाड्या वस्त्या इथेसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.