संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी १ हजार ६०१ कोटींचा निधी.- आ.रणजितसिंह मोहिते-पाटील.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आ.रणजितसिंह यांना लेखी पत्रान्वये कळवले.
टीम विजयदिप न्यूज.
श्री.संत तुकाराम महाराज पालखी महामार्गातील इंदापूर ते बोंडले या ४७ किलोमीटरच्या कामासाठी भारतमाला योजनेतून १ हजार ६०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लेखी पत्र लिहून कळवले असल्याची माहिती भाजप नेते आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितली.
इंदापूर ते अकलूज आणि बोंडले या ४७ किलोमीटरच्या पालखी महामार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण झालेले आहे. या पालखी महामार्गावरील अनेक विवादित मुद्दे सोडवण्यात आले आहेत. इंदापूर जवळील किलोमीटर ८३.५०० ते बोंडले येथील किलोमीटर १३०.२०० या ४६ किलोमीटर ७०० मीटरच्या अंतरातील पालखी महामार्गासाठी केंद्राच्या भारतमाला योजनेतून १ हजार ६०१ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या कामाला प्रत्यक्षात लवकरच सुरुवात होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या कामी विशेष लक्ष घालून जगद्गुरू संत तुकाराम महाराज या ९६५(ग) क्रमांकाच्या पालखी महामार्गासाठी भरीव निधीची तरतूद केल्याने हे काम लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा आ.रणजितसिंह मोहिते यांनी व्यक्त केली. या कामास गती दिल्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आदींचे आभार व्यक्त केले.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. संपादित मालमत्तांचा मोबदला देण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आता यासाठी मोठा निधी उपलब्ध होत असल्याने लवकरच या पालखी महामार्गाच्या कामास सुरुवात होईल.
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, विधानपरिषद सदस्य